तिरोडा नगराध्यक्षांसह दोघे एसीबीच्या ताब्यात

३.२० लाखांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
गोंदिया,
tiroda municipal council तिरोडा नगरपरिषद निवडणुकीदरम्यान डेकोरेशन व केटरिंगची सेवा पुरविलेल्या कंत्राटदाराच्या प्रलंबित बिलाच्या मोबदल्यात लाखो रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तिरोडा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अशोक रामजीबाबू असाटी आणि खासगी इसम कैलास किसन वाघमारे या दोघांना शनीवारी १८ जुलै रोजी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून दोघांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 
 
tiroda municipal council
 
तक्रारदार हे डेकोरेशन व केटरिंग व्यवसायिक असून त्यांनी तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी सेवा पुरविली होती. त्याबदल्यात २८ डिसेंबर २०२५ रोजी हर्षल केटरिंगच्या नावाने ७ लाख ७२ हजार रुपये आणि उज्वला डेकोरेशनच्या नावाने १७ लाख ५० हजार रुपये, असे एकूण २५ लाख २२ हजार रुपयांचे बिल नगरपरिषदेकडे सादर केले होते. तक्रारदारांनी २० मे २०२६ रोजी बिलाच्या मंजुरीसाठी नगराध्यक्ष अशोक असाटी यांची भेट घेतली असता, त्यांनी तक्रारदार यांना १६ लाख रुपयेच मंजूर होऊ शकतात. त्यातूनही सीओ, ऑडिटर व कॅशियर यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर २१ मे रोजी झालेल्या भेटीत नगराध्यक्षांनी तक्रारदाराच्या हातावर ३ लाख २० हजार रुपये लिहून एवढी रक्कम द्यावी लागेल, अशी मागणी केली.
 
 
मात्र, तक्रारदारांनी लाच देण्यास नकार देत ८ जून रोजी गोंदिया येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. याअधारे पथकाकडून पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत नगराध्यक्षांनी १६ लाख रुपयांचे बिल मंजूर करून प्रथम ६ लाख रुपयांचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात १ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही रक्कम त्यांचे पीए शुभम भोयर यांच्याकडे देण्यास सांगून उर्वरित १० लाख रुपयांचा धनादेश मिळाल्यानंतर पुढील रक्कम आणून देण्याची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. दरम्यान, ९ जून रोजी सापळा कारवाई केली असता तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने नगराध्यक्ष व त्यांच्या पीएने लाच स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याने सापळा अयशस्वी ठरला. मात्र, पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाल्याने पथकाने कारवाई करत तिरोडा पोलिस ठाण्यात शनीवारी सकाळी दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेऊन बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली असून त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.