नांदगाव पेठ,
two rare snakes found in nandgaon peth परिसरात दुर्मिळ पोवळा जातीचे दोन विषारी साप आढळून आले. विशेष म्हणजे, एकाच दिवशी या सापांना सुरक्षितरीत्या रेस्क्यू करून त्यांना जीवनदान देण्यात आले. ही मोहीम जीवरक्षणम् फाऊंडेशनने यशस्वी केली. फाऊंडेशनच्या अध्यक्ष संघटना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोवळा ही सापांची प्रजाती दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली असून, निसर्गातील बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. फाऊंडेशनचे सदस्य मनोज हटवार यांनी एका पोवळा सापाचे रेस्क्यू करून त्याला सुरक्षित अधिवासात सोडले.

दरम्यान, त्याच रात्री नांदगाव पेठ येथील रोशन डोईफोडे यांच्या घराजवळ आणखी एक साप आढळून आला. त्यांनी तातडीने सर्पमित्र संघटना पाटील यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने त्या सापालाही सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले. रेस्क्यूदरम्यान संघटना पाटील यांनी सांगितले की, पोवळा हा भारतातील सर्वात लहान विषारी सापांपैकी एक असून, तो कोरल स्नेक या दुर्मिळ प्रजातीमध्ये मोडतो. मराठीत या सापाला ‘पोवळा’ असे म्हणतात. या सापामध्ये नाग आणि मण्यारप्रमाणे न्यूरो-टॉक्सिक विष आढळते. त्यामुळे तो अत्यंत विषारी मानला जातो. या सापाची लांबी साधारणतः एक ते दीड फूट असते. दिसायला अतिशय सडपातळ आणि करंगळीएवढ्या जाडीचा असलेला हा साप जमिनीखालील ओलसर माती, पानांचे ढिगारे तसेच विटा आणि दगडांच्या खाली वास्तव्य करतो. त्यामुळे तो सहसा लोकांच्या नजरेस पडत नाही. या सापाच्या पोटाखालचा भाग केशरी रंगाचा असतो, हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
नागरिकांनी घ्यावी काळजी
दुर्मिळ आणि विषारी असलेल्या पोवळा सापाला हाताळण्याचा प्रयत्न करू नये. असा साप आढळल्यास तत्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जीवरक्षणम् फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.