तभा वृत्तसेवा
उमरखेड,
umarkhed theft cases शहरात गेल्या महिनाभरापासून घरफोडी आणि चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून, आता चोरट्यांनी थेट व्यापारी प्रतिष्ठान आणि देवस्थानालाही लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी मध्यरात्री कृषी उत्पन्न बाजार समिती संकुलातील जिजाऊ प्रोव्हिजन या दुकानाचे शटर फोडून सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांचा खाद्यसाठा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. त्यानंतर नागेशवाडी येथील टेकडीवरील महादेव मंदिरातही चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्याने पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उपविभागीय कार्यालयाकडे जाणाèया रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात असलेले जिजाऊ प्रोव्हिजन हे दुकान गोकुळनगर येथील आशिष जाधव व सतीश जाधव या दोन भावांच्या मालकीचे आहे. 18 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर व कुलपे तोडून आत प्रवेश केला. दुकानातील डाळ, तांदूळ, शेंगदाण्याचे कट्टे, खाद्यतेलाचे मोठे पाच डबे, पाच लिटरचे दहा कॅन, उच्च प्रतीचा सुका मेवा तसेच इतर महागडा खाद्यसाठा असा एकूण सुमारे 1.30 लाख रुपयांचा ऐवज निनावी वाहनातून चोरून नेला.
दुकानासमोर गंगासागर अभ्यासिकेतील काही विद्यार्थी उपस्थित असल्याने संशयास्पद हालचाली त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यांनी दुकानमालक आशिष जाधव यांना पहाटे सुमारे 3 वाजता माहिती दिली. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर दुकान फोडल्याचे स्पष्ट झाल्याने जाधव बंधू हतबल झाले. याप्रकरणी 19 जुलै रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे
दरम्यान, नागेशवाडी गावातील टेकडीवर असलेल्या भाविकांचे आराध्य दैवत महादेव मंदिरातही अज्ञात चोरट्यांनी प्रवेशद्वारे तोडून दानपेट्या कापल्या तसेच पूजेचे साहित्य चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या निदर्शनास आली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
सतत घडणाèया मोठ्या चोरीच्या घटनांमुळे शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, पोलिसांच्या रात्रगस्तीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोन्ही घटनांमध्ये फॉरेन्सिक प्रयोगशाळेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून वैज्ञानिक पद्धतीने पुरावे संकलित करून तपास सुरू आहे. चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावून शहरातील वाढत्या चोरीच्या सत्राला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.