विदर्भ साहित्य व सामाजिक चळवळीत वर्धा जिल्हा अग्रगण्य : दाते

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
हिंगणघाट

vidarbha sahitya sangh साहित्य व सामाजिक चळवळीत वर्धा जिल्ह्याने नेहमीच देशाला दिशा दाखविलेली आहे. महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्याशी वैचारिक नाळ या जिल्ह्याची जुळलेली आहे. साहित्य क्षेत्रातही जिल्ह्याने देशाला मार्गदर्शन केले आहे. हिंगणघाट सारख्या चळवळीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात विदर्भ साहित्य संघाची शाखा उशिराने का होईना आज होत आहे. या साहित्य संघाच्या माध्यमातून येथील साहित्य चळवळ अधिक मजबूत होईल, असे मत विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते यांनी व्यक्त केले.
 

vidarbha sahitya sangh inaugurates hinganghat branch pradeep date highlights wardha’s literary legacy 
ते विदर्भ साहित्य संघाच्या हिंगणघाट शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्याच हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी विसा संघ वर्धा शाखेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंढे होते. उद्घाटन व साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांच्या हस्ते झाले तर बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, युवा नेते अतुल वांदिले, विसासचे संमेलन संयोजक इरफान शेख, शाखाध्यक्ष गिरधर काचोळे, प्रा. लीला नरड व्यासपिठावर उपस्थित होते.अॅड. कोठारी म्हणाले, विदर्भातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या विसा संघाची शाखा आपल्या गावी आजवर नसल्याची खंत होती. परंतु आजच्या या शाखेच्या उद्घाटनाने ही उणीव दूर झाली. यापूर्वी अंदाजे ४० वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. राम शेवाळकर यांच्या हस्ते या साहित्य संघाची स्थापना झाली होती. परंतु, दुर्दैवाने ही संस्था त्याकाळी फार काळ चालू शकली नाही आणि अल्पावधीत बंद झाली. आज तब्बल ४० वर्षांनंतर या संस्थेची आपल्या शहरात पुनः स्थापना होत आहे. साहित्य हे समाज घडविण्याचे कार्य करीत असते. सुसंस्कृत समाज घडण्यासाठी साहित्यिकांची समाजाला गरज असल्याचे ते म्हणाले.नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी साहित्यिकांचे विचार समाज घडवतात. म्हणूनच राजकारण, प्रशासन, विज्ञान, आणि तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांत मराठी साहित्यिकांचा यथोचित सन्मान व सहभाग असायला हवा, असेही त्या म्हणाल्या.
प्रा. राजेंद्र मुंढे यांनी विज्ञानाने वेग दिला; पण मूल्यांचा वेध घेण्याचे काम साहित्यालाच करावे लागणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग येत असताना मानवी विवेक, करुणा आणि सर्जनशीलता यांचे जतन करण्याची जबाबदारी अधिकच वाढली आहे. म्हणून आज साहित्य ही केवळ कलानिर्मिती नसून लोकशाही, समता, सहअस्तित्व आणि मानवी अस्मितेची पहारेकरी शक्ती असल्याचेही त्यांनी सांगितले. संचालन प्रा. अभय दांडेकर, प्रास्ताविक गिरधार काचोळे यांनी केले.
तरुण भारतचे कौतुक
दाते यांनी आपल्या भाषणातून या साहित्य संमेलनाच्या बातमीची दखल तरुण भारताने सर्वं आवृत्तीमध्ये प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तभाची साहित्याप्रती असलेल्या रुचीचा गौरवाने उल्लेख केला.