स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या महिला बचतगटांचा अभिमान

नगराध्यक्ष अ‍ॅड. मोहिनी नाईक यांचे गौरवोद्गार

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद,
pusad news  शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्या तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला बचतगटांचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार पुसद नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. मोहिनी नाईक यांनी काढले.पुसदमधील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुधाकर नाईक प्रेक्षागृहात महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्रांच्या वतीने 16 वी सर्वसाधारण वार्षिक सभा व महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
 
 

women self help groups in pusad praised for starting businesses through government schemes
 
या निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष अ‍ॅड. मोहिनी नाईक बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अतुल इंगळे, प्र.जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, आदिवासी विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी कोटूरवार, बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, पुसद रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय ठाकरे, केंद्राच्या अध्यक्ष, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष मोहिनी नाईक म्हणाल्या की, पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला विशेषतः आदिवासी महिला शासनाच्या योजनांचा लाभ घेवून विविध व्यवसाय सुरु करत असल्याचा अभिमान आहे. पुसदमध्ये उद्योग वाढले पाहिजे हा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा नेहमीच आग्रह असतो. त्या दृष्टीने तालुक्यात उद्योग वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. महिलांना उद्योग उभारण्यासाठी शासनाचे अनेक प्रकल्प व योजना राबविल्या जात आहेत, त्याचा लाभ महिलांनी घेतला पाहिजेत. अनेक महिलांनी संघर्षातून स्वत:चे व्यवसाय सुरू केले असून ते हिंमतीचे उत्तम उदाहरण आहे.
पुसदमध्ये दुग्धव्यवसायाला वाव असून डेअरी कॉलेजच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध आहे. पुसदमध्ये अनेक क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे. त्यामुळे संघटित होवून तालुक्यातील माविम, उमेद, आदिवासी विकास, कृषी इ. विभागांतर्गत असलेल्या महिला बचतगटांनी पुसद तालुक्यात जास्तीत जास्त व्यवसाय सुरु करावे. लोक संचालित साधन केंद्र पुसद करीत असलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या या प्रयत्नामुळे पुसद तालुका आर्थिकदृष्या सक्षम होईल, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महिला व बाल विकास विभागाची निर्मिती माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी केल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल म्हणाले, सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेची माहिती देवून जास्तीत जास्त महिलांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांनी जास्तीत जास्त बचत गट स्थापन करावे, येणाèया काळात भरपूर योजना येणार आहे. त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अतुल इंगळे यांनी नाबार्ड व शासनाच्या अनुदानित कर्ज योजनांची माहिती दिली. महिला बचत गटांनी उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी बँका व योजनांद्वारे कर्ज घ्या, सुरक्षिततेसाठी सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल स्वरुपात करण्याचे आवाहन केले.प्रास्ताविकात माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रकल्प व योजनांची माहिती दिली. महिला स्वयंपूर्ण व सक्षम झाल्या पाहिजे, त्यासाठी माविमचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात सात हजार हून अधिक बचत गटांच्या माध्यमातून 80 हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून तालुक्यात पंचसूत्री कार्यक्रम राबविला जात आहे.