मुंबई
yami gautam अभिनेत्री यामी गौतम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सातत्याने प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या यामीने आता ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्येही मोठी कामगिरी केली आहे. शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २०२४ मधील उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांचा गौरव करण्यासाठी पुरस्कार विजेत्यांची अधिकृत घोषणा केली.
यामध्ये यामी गौतम अभिनित ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाने विशेष छाप पाडली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. या मोठ्या यशानंतर यामीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
भावुक पोस्ट
राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर यामीने लिहिले की, तिच्यासाठी हा सन्मान केवळ चित्रपटांच्या यादीत आणखी एक पुरस्कार जोडला जाण्याइतपत मर्यादित नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीचे आणि प्रतीक्षेचे हे फळ असल्याचे तिने म्हटले आहे. आपल्या कामावर असलेल्या विश्वासाची आठवण करून देताना तिने ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट तिच्यासाठी इतका खास का आहे, हेही सांगितले.
यामीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “प्रत्येक प्रवासात असा एक क्षण नक्की येतो, जो आपल्याला आठवण करून देतो की इतक्या अडचणींनंतरही आपण हार का मानली नाही. आज माझ्यासाठी तोच क्षण आहे. ‘आर्टिकल ३७०’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हा असा सन्मान आहे, जो मी आयुष्यभर लक्षात ठेवेन.”
तिने पुढे सांगितले की, गेल्या चौदा वर्षांमध्ये तिने केवळ आपल्या कामाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला असून नेहमी मनापासून काम केले आणि आपल्या अभिनयाला स्वतःची ओळख निर्माण करू दिली. हा पुरस्कार तिच्या आशा, मेहनत, धैर्य आणि सिनेमावरील अतूट प्रेमाचा परिणाम असल्याचेही तिने नमूद केले.
यामीने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे तिचे अनेक वर्षांपासून जपलेले स्वप्न होते आणि आता ते पूर्ण झाले आहे. हा सन्मान ती प्रेम, कृतज्ञता आणि नम्रतेने स्वीकारत असल्याचे तिने म्हटले. ‘आर्टिकल ३७०’ हा तिच्यासाठी कधीही सामान्य चित्रपट नव्हता, तर मनापासून विश्वास असलेली एक कथा होती, असे तिने सांगितले.हा चित्रपट तिच्या होम प्रोडक्शनचा भाग असल्याने हा सन्मान तिच्यासाठी आणखी भावनिक आणि वैयक्तिक असल्याचे यामीने स्पष्ट केले. चित्रपटाच्या सेटवरील प्रत्येक चर्चा आणि प्रत्येक क्षण एका उद्देशाने प्रेरित होता, तो म्हणजे ही कथा पूर्ण प्रामाणिकपणे आणि विश्वासाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, असे तिने म्हटले.यामीने राष्ट्रीय पुरस्काराच्या परीक्षक मंडळासह या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तिने चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, क्रू सदस्य आणि ‘आर्टिकल ३७०’ला प्रेम देणाऱ्या प्रेक्षकांचेही विशेष आभार व्यक्त केले.
“अर्थपूर्ण कथा प्रेक्षकांच्या yami gautam मनापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःचा मार्ग तयार करतात, याची आठवण तुम्ही आम्हाला करून दिली,” असे यामीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. तसेच कुटुंब, टीम, शुभचिंतक आणि प्रत्येक त्या व्यक्तीचे आभार मानले, ज्यांनी प्रत्येक चढ-उताराच्या काळात तिच्यावर विश्वास ठेवला.
यामीने आपल्या पोस्टच्या शेवटी हा पुरस्कार एखाद्या स्वप्नाचा शेवट नसून एका मोठ्या जबाबदारीची सुरुवात असल्याचे म्हटले. पुढेही नवनवीन आव्हाने स्वीकारत, महत्त्वाच्या कथा सांगण्याची जबाबदारी आता अधिक वाढली असल्याचे तिने नमूद केले. “स्वप्ने तेव्हाच पूर्ण होतात, जेव्हा तुम्ही आणि तुमची जिद्द हार मानत नाही,” असा संदेश देत तिने हा पुरस्कार अजूनही आपल्या खास क्षणाची वाट पाहणाऱ्या प्रत्येक स्वप्नाळू व्यक्तीला समर्पित केला.