तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
zilla parishad school नेर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण व्यवस्थेलाच काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.शाळेच्या वेळेत मुख्याध्यापक चक्क वर्गात झोपलेल्या, तर त्यांचे पती मद्यधुंद अवस्थेत चक्क मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर बसलेले आढळल्याने संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकत तीव्र निषेध नोंदविला. या प्रकरणी गटशिक्षणाधिकाèयांकडे लेखी तक्रार करण्यात आली असून संबंधित शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर ढोके यांचा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर त्याने ‘मॅडम शाळेत झोपल्या आहेत’ अशी माहिती दिली. त्यानंतर सुधीर ढोके यांनी स्वत: शाळेत जाऊन पाहणी केली असता संबंधित मुख्याध्यापिका वर्गखोलीत झोपलेल्या आढळल्या. याचवेळी त्यांचे पती, जे शाळेच्या सेवेत नसल्याचे सांगितले जाते, ते मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर बसलेले होते.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, संबंधित व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होती. पालकांनी याबाबत जाब विचारताच त्याने अरेरावी करत दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला.
दरम्यान, मुख्याध्यापिका वर्गात झोपलेल्या अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर संबंधित शिक्षिकेची तातडीने बदली करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सुधीर ढोके यांनी गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत संबंधित शिक्षिका नियमित वेळेत शाळेत उपस्थित राहत नसल्याचा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा तसेच विचारणा करणाèयांना धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शिक्षिका रुजू झाल्यापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि शाळेच्या पटसंख्येवर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचे नाव या शाळेतून काढून इतर शाळांमध्ये प्रवेश दिल्याचेही सांगण्यात आले. निवडणुकीसंदर्भातील शासकीय जबाबदारीही त्यांनी योग्यरीत्या पार पाडली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच वटफळी केंद्राचे केंद्रप्रमुख घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. मात्र, तोपर्यंत संबंधित मुख्याध्यापिका आपल्या पतीसह तेथून निघून गेल्या होत्या.
गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांनी तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून संबंधित शिक्षिकेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे शिक्षणाच्या आईचा घो झाल्याची संतप्त प्रतिक्रिया पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाèयांवर कठोर कारवाई करून शाळेतील शैक्षणिक वातावरण पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.