तभा वृत्तसेवा
वणी,
youth-caught-with-cannabis : शहरातील अमली पदार्थांच्या विक्री व सेवनावर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या वणी पोलिस डी.बी. पथकाने विशेष मोहिम सुरू केली. यात शनिवारी एक महत्त्वाची कारवाई करत 370 ग्रॅम गांजासह एका युवकाला अटक केली. आरोपीकडून गांजा, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल असा एकूण 28 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस ठाणे वणीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शहरात पेट्रोलिंग सुरू असताना एकतानगर येथील नगरपरिषद कॉम्प्लेक्सजवळ सापळा रचला. गांजाविक्री करण्यासाठी थांबलेल्या संशयित युवकाची झडती घेतली असता त्याच्या हातातील पिशवीत अंदाजे 370 ग्रॅम गांजा आढळला.
या प्रकरणी सुजल मंगेश गोहोकार (वय 20, एकतानगर, वणी) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपीकडून गांजा, विक्रीतून मिळालेली रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल असा एकूण 28,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनात, पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकप्रमुख पोउपनि सय्यद साजिद, पोलिस हवालदार गजानन सावसाकडे, श्याम राठोड, पोलिस अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पुष्पलवार, मोनेश्वर खंडरे, रितेश भोयर, चालक शुभम किरांके यांनी केली.