16 मुलं,12 बाय 12 ची खोली आणि अमानुष अत्याचार!

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
ओहायो,
Abuse of 16 children in Ahoyo अमेरिकेतील ओहायो राज्यातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी मोडकळीस आलेल्या एका घरातून एकाच कुटुंबातील तब्बल 16 मुलांची सुटका केली असून, या मुलांची अवस्था पाहून अधिकारीही हादरले. तपासात समोर आले की, मुलांचे वय दीड वर्षांपासून 18 वर्षांपर्यंत आहे. यात मुलगे आणि मुली दोघांचाही समावेश आहे. गेल्या सुमारे चार वर्षांपासून या मुलांना घरातील 12 बाय 12 फूटाच्या एका छोट्या खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. खोलीत आणि घरभर मानवी विष्ठा पसरलेली होती. सर्वत्र कचरा आणि घाणीचे ढिगारे असल्याने परिस्थिती अत्यंत भयावह होती. विंटन काउंटीचे शेरीफ रायन केन यांनी आपल्या कारकिर्दीत असे दृश्य कधीही पाहिले नसल्याचे सांगितले.
 

ahoya 
अत्यंत अस्वच्छ वातावरणात राहत असलेली ही मुले गंभीर कुपोषणाची शिकार झाली होती. अनेक मुलांना व्यवस्थित बोलताही येत नव्हते, तर 18 वर्षांची मानसिकदृष्ट्या विकलांग मुलगी स्वतःचे नावही लिहू शकत नसल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी मुलांचे आई-वडील तसेच आजी-आजोबा अशा चार प्रौढांवर बालकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ही घटना केवळ एका कुटुंबाशी संबंधित असून तपास वेगाने सुरू आहे. ओहायोचे अटर्नी जनरल अँडी विल्सन यांच्या माहितीनुसार, पोलिस एका वेगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी शोध वॉरंट घेऊन त्या घरात पोहोचले होते. मात्र घरात प्रवेश करताच समोर आलेले दृश्य पाहून सर्वच जण स्तब्ध झाले. घरात तब्बल 16 मुले राहत असल्याची माहिती पोलिसांनाही यापूर्वी नव्हती. या मुलांनी कधीही शाळेचे तोंड पाहिले नव्हते आणि कुटुंबाबाहेरील व्यक्तींना त्यांच्याबद्दल जवळपास काहीच माहिती नव्हती.
अँडी विल्सन यांनी सांगितले की, अनेक मुले सामान्य संवाद साधण्यास असमर्थ होती. काही मुलांची अवस्था इतकी गंभीर होती की त्यांचे वर्तन पूर्णपणे असामान्य दिसत होते. सुटका केल्यानंतर सात मुलांना तातडीने कोलंबस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन मुलांना विमानाने रुग्णालयात हलवण्यात आले. एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून इतर मुलांनाही विशेष वैद्यकीय उपचारांची गरज आहे.या प्रकरणात चारही आरोपींवर गंभीर शारीरिक व मानसिक इजा पोहोचवल्याप्रकरणी दुसऱ्या श्रेणीतील गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व मुलांना सध्या ओहायो डिपार्टमेंट ऑफ जॉब्स अँड फॅमिली सर्व्हिसेसच्या तात्पुरत्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
बुधवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची निर्दोष अशी प्राथमिक नोंद केली असून प्रत्येकी 3 लाख डॉलर्सचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सध्या आरोपींसाठी कोणताही वकील नियुक्त झालेला नाही. तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. हे कुटुंब गेल्या 20 वर्षांपासून दक्षिण ओहायोतील विविध भागांत राहत होते. मुलांची वैद्यकीय कागदपत्रे आणि सरकारी नोंदी जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आल्याचा संशय आहे, जेणेकरून त्यांच्या अस्तित्वाची माहिती बाहेरच्या जगाला मिळू नये. हॅमडेन व्हिलेजमधील ज्या घरातून मुलांची सुटका करण्यात आली, ते घर रेल्वे मार्गाजवळ असून झाडे आणि दाट झुडपांमुळे बाहेरून एकाकी दिसत होते. घराबाहेर तुटलेले टायर, मुलांच्या मोडकळीस आलेल्या सायकली आणि इतर भंगार विखुरलेले होते. स्थानिक रहिवासी जोसेफ स्टुअर्ट यांनी सांगितले की, त्यांनी या घरात कधीही मुलांना बाहेर खेळताना पाहिले नव्हते. या घटनेमुळे अमेरिकेत बालसुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वीही अशाच अमानुष अत्याचारांच्या घटना समोर आल्या असून, ओहायोतील या घटनेने संपूर्ण अमेरिकेला हादरवून सोडले आहे.