बुलढाणा,
sudhir-khande : शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ३०० कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी काटेकोर आणि अचूक नियोजन करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, सामाजिक वनीकरणचे उपवनसंरक्षक विपुल राठोड, तसेच ऑनलाइन मुख कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.
राज्यात पर्यावरण संतुलनासाठी आणि हरित आच्छादन वाढवण्यासाठी शासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत वर्ष २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्षलागवड करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी दरवर्षी १० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून संबंधित विभागाना दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी गतीने कामाला लागणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड ही पूर्णपणे डिजिटल आधारित वृक्षारोपण’ असणार आहे. लावण्यात येणार्या प्रत्येक वृक्षाचे जिओ टॅगिंग व नियमित देखरेख केली जाणार आहे. वृक्षांचे जिओ टॅगिंग होणार असल्याने प्रत्येक विभागाने व नागरिकाने अत्यंत काळजीपूर्वक वृक्षारोपण करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
वृक्ष लागवडीदरम्यान केवळ स्थानिक प्रजातींच्या वृक्षांचीच लागवड करण्यात यावी, जेणेकरून त्यांचे संवर्धन सहज होईल. ही लागवड प्रामुख्याने अकृषक पडिक जमिनीवर केली जाणार असून, यासाठी स्वतंत्र ’लँड बँक’ तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लागवडीसाठी पुरेशा प्रमाणात रोपे उपलब्ध आहेत. शहरी भागांमध्ये हरित शहर ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संबंधित विभागांनी विशेष नियोजन करावे. तसेच शासनाच्या या मोहिमेला गती देण्यासाठी व्हीबी-जी राम जीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून घ्यावी. शासनाचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम लोकचळवळ व्हावा आणि दिलेले लक्ष्य पूर्ण व्हावे, यासाठी सर्व यंत्रणांनी आपापल्या विभागाचे चोख नियोजन करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.