लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट?

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Beneficiaries of Mukhyamantri Ladki Bahin scheme राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जुलै महिना सुरू झाला असला तरी राज्यातील अनेक पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. त्यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार का, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, जून महिन्याचा हप्ता रखडल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता प्रशासनाकडून रखडलेले हप्ते लवकरच वितरित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
 
 
 
ladli bahin kyc

८० लाख महिला ठरल्या अपात्र
यामुळे जून आणि जुलै महिन्यांचे प्रत्येकी १५०० रुपये असे एकूण ३००० रुपये एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी विविध स्तरांवर याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी आणि पात्रतेशी संबंधित समस्या समोर आल्या आहेत. ई-केवायसी अपूर्ण असणे, बँक खात्याशी आधार लिंक नसणे तसेच पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणे यांसारख्या कारणांमुळे अनेक महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे ८० लाख महिला सध्या अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आता रखडलेला जून महिन्याचा हप्ता आणि जुलैचा हप्ता एकत्र मिळणार का, याकडे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.