तेहरान,
bid farewell to Khamenei इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ४ जुलैपासून त्यांच्या शासकीय अंत्ययात्रेला सुरुवात होणार असून ९ जुलै रोजी त्यांच्यावर अंतिम दफनविधी पार पडणार आहे. विशेष म्हणजे, खामेनेई यांची अंत्ययात्रा इराण आणि इराक अशा दोन देशांतील महत्त्वाच्या धार्मिक शहरांतून जाणार आहे. या अंत्ययात्रेचा मार्ग धार्मिक, राजकीय आणि वैचारिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राजधानी तेहरानसह कोम, कर्बला, नजफ आणि अखेरीस मशहद या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व शहरे शिया समुदायासाठी अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्वाची आहेत.

खामेनेई यांचे पार्थिव सर्वप्रथम तेहरानमधील ग्रँड मसल्ला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तेहरान हे इराणच्या सत्ताकेंद्राचे प्रमुख ठिकाण असल्याने येथून सुरू होणारी अंत्ययात्रा देशाच्या राजकीय नेतृत्वाचे आणि सातत्याचे प्रतीक मानली जात आहे. राष्ट्रपती कार्यालय, संसद, न्यायपालिका आणि लष्करी मुख्यालय याच शहरात असल्याने या प्रवासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यानंतर अंत्ययात्रा कोम येथे पोहोचणार आहे. शिया धार्मिक शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोममध्ये अनेक प्रतिष्ठित धार्मिक संस्था आहेत. येथे धार्मिक नेते, विद्वान आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने खामेनेई यांना अखेरचा निरोप देणार आहेत.
कर्बला येथे श्रद्धांजली कार्यक्रम
इराणनंतर अंत्ययात्रा इराकमध्ये प्रवेश करणार आहे. कर्बला येथे इमाम हुसेन यांच्या दर्ग्याजवळ श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शिया समाजासाठी कर्बला हे अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी होणारा कार्यक्रम खामेनेई यांच्या धार्मिक आणि वैचारिक वारशाशी जोडला जात आहे. यानंतर नजफमध्येही अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. नजफ हे पहिले शिया इमाम अली यांच्या दर्ग्यामुळे जगभरातील शिया समाजासाठी श्रद्धेचे केंद्र आहे. या शहरातील कार्यक्रमामुळे इराणबाहेरील शिया समुदायामध्येही खमेनेई यांचे स्थान अधोरेखित होणार आहे.
जन्माच्या ठिकाणीच दफन करणार
अखेर ९ जुलै रोजी अयातुल्ला अली खामेनेई यांना इराणमधील पवित्र शहर मशहदमध्ये दफन करण्यात येणार आहे. मशहद हे इमाम रझा यांच्या दर्ग्यासाठी जगप्रसिद्ध आहे आणि दरवर्षी लाखो भाविक येथे भेट देतात. विशेष म्हणजे, खामेनेई यांचा जन्मही मशहदमध्येच झाला होता आणि त्यांचे बालपण याच शहरात गेले. त्यामुळे त्यांच्या अंतिम विश्रांतीसाठी मशहदची निवड प्रतीकात्मक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.