एकनाथजी रानडे यांची जयंती शासनस्तरावर

स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
अमरावती, 
eknathji-ranade : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला यश आले आहे. कन्याकुमारी स्थित स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार श्रद्धेय एकनाथजी रानडे यांची जयंती आता शासनस्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील टिमटाळा हे एकनाथजी यांचे मुळ गाव आहे.
 
 
 
amt
 
 
 
अमरावती जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, संबंधित प्रशासकीय कार्यालये, प्रसिद्धी माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी निवेदनाद्वारे उपरोक्त मागणी लावून धरली होती. त्यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे एकनाथजी रानडे यांची जयंती शासनस्तरावर साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा गावच्या मायभूमीत जन्मास आलेल्या एकनाथजींनी देशातील जनतेकडून एक-एक रुपया जमा करून कन्याकुमारी येथील शिल्पावर स्वामी विवेकानंदांचे भव्य दिव्य जगप्रसिद्ध असे वास्तुशिल्प उभारले. सामाजिक कार्यात अग्रेसर राहून देशसेवा करणारे एकनाथजी अमरावती जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहे. याच अनुषंगाने त्यांची जयंती शासनस्तरावर साजरी व्हावी यासाठी टिमटाळा येथील रहिवासी श्रीपाल सहारे यांनी जनप्रतिनिधी व प्रशासनदरबारी आपली मागणी रेटून धरली होती.
 
 
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत प्रशासनाने आपली मोहर उमटवली आहे. सदर मागणीच्या अनुषंगाने जयंती कार्यक्रमांमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता प्राप्त झाल्यावर परिपत्रक निर्गमित करण्यात येते. त्यानुसार आगामी सन २०२७ च्या शासन परिपत्रकात श्रद्धेय एकनाथजी रानडे यांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये समावेशाकरीता प्रस्ताव शासन आदेशार्थ सादर करण्यात येत असल्याने टिमटाळापरिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.