नवी दिल्ली,
death-threats : आयसीसी (ICC) महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या वेळापत्रकावर आणि नियमांवर टीका केल्यामुळे इंग्लंडच्या दोन स्टार महिला क्रिकेटपटूंना सोशल मीडियावर गंभीर स्वरूपाच्या शिवीगाळीला आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना सामोरे जावे लागले आहे. इंग्लंडची वेगवान गोलंदाज केट क्रॉस आणि माजी क्रिकेटपटू अॅलेक्स हार्टले यांनी त्यांच्या 'नो बॉल्स' या पॉडकास्टमध्ये या धक्कादायक प्रकाराचा खुलासा केला आहे.
नेमका वाद काय होता?
विश्वचषकाच्या एका नियमानुसार, जर भारतीय महिला संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला, तर तो थेट मंगळवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीतच खेळेल, असे आधीच निश्चित करण्यात आले होते. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता (प्राईम टाईम) हा सामना होणार असल्याने भारतीय प्रेक्षकांना टीव्हीवर सामना पाहणे सोपे जावे, म्हणून आयसीसीने हा निर्णय घेतल्याची चर्चा होती.
याच नियमावर केट क्रॉस आणि अॅलेक्स हार्टले यांनी भाष्य केले होते. केट क्रॉस म्हणाली होती, "आयसीसीने व्यावसायिक कारणांसाठी एकाच संघाला डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक किंवा नियम बनवणे पूर्णपणे चुकीचे आणि हास्यास्पद आहे."
गैरसमजातून सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी केट आणि अॅलेक्स यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावत त्या भारतीय संघाचा द्वेष करत असल्याचा आरोप केला. याविषयी बोलताना केट क्रॉस म्हणाली, "आम्ही सोशल मीडियावरील एका पोस्टवर तब्बल ४५० हून अधिक धमक्यांचे आणि शिवीगाळीचे मेसेज पाहिले, तर सामान्यतः आम्हाला फक्त ३० ते ४० मेसेज येतात. आम्ही भारतीय संघावर किंवा खेळाडूंवर कोणतीही वैयक्तिक टीका केली नव्हती, तर आमचा आक्षेप फक्त आयसीसीच्या धोरणावर होता."
आयसीसी आणि क्रिकेटपटूंचे स्पष्टीकरण
हा वाद वाढल्यानंतर आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी अॅलेक्स हार्टलेशी संवाद साधून स्पष्टीकरण दिले की, हा निर्णय कोणत्याही विशिष्ट संघाला झुकते माप देण्यासाठी नव्हता, तर जागतिक स्तरावर आणि यूकेमधील प्रेक्षकांची संख्या लक्षात घेऊन वेळापत्रक तयार करण्यात आले होते. दरम्यान, भारतीय संघ या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे आयसीसीचा तो नियम लागू करण्याची वेळच आली नाही. मात्र, सोशल मीडियावरील या टोकाच्या गैरसमजामुळे महिला क्रिकेटपटूंना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.