हिंगोली,
Earthquake tremors in Aundha Nagnath हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुका आणि आसपासच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री १ वाजून २० मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू फुलदाभा आणि जलालदाभा परिसरात जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर खोलीवर असल्याने धक्के अधिक तीव्रतेने जाणवले. भूकंपाच्या काही क्षणांपूर्वी भूगर्भातून मोठा गडगडाट झाल्याचे नागरिकांनी सांगितले. अचानक झालेल्या या आवाजानंतर जमिनीला हादरे बसू लागल्याने अनेकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली.
रात्रीच्या शांततेत अचानक झालेल्या या घटनेमुळे घरांच्या खिडक्यांच्या काचा हलू लागल्या. घरातील भांडी तसेच कपाटातील वस्तू हलल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.या भूकंपाचे धक्के औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा, जलालदाभा, पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, निशाणा, असोंदा, काकडदाभा, पांगरा, मेथा, जडगाव, राजापूर आणि जांब या गावांमध्ये जाणवले. तसेच वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, कुपटी, वापटी, कुरुंदा आणि गिरगाव या भागांनाही हादरे बसले.