फोनवर बोलता बोलता थेट मॅनहोलमध्ये!

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
मुंबई,
falling into a manhole in Sakinaka मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय अस्लम शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही घटना दुपारी १२.२६ वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, खासगी कंत्राटदाराचे कर्मचारी मॅनहोलची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी झाकण उघडून काम करत होते. त्याचवेळी मोबाईलवर बोलत जाणाऱ्या अस्लम शेख यांना उघड्या मॅनहोलचा अंदाज आला नाही आणि ते थेट त्यात कोसळले.
 
 
sakinaka manhole news
 
घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मॅनहोलमध्ये शिडी टाकून शोध घेण्यात आला. मात्र, सुरुवातीला फक्त त्यांची छत्री आणि चप्पलच सापडली. मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने ते वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, साकीनाका पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि महानगरपालिका अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अनेक तास चाललेल्या शोधमोहीमेनंतर अस्लम शेख यांचा मृतदेह सापडला. अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.