कारंजा लाड
food safety action शहरातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न मिळावे आणि हॉटेल व्यवसायात अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने अन्न सुरक्षा अधिकारी कुणाल बरडे यांनी आपल्या पथकासह कारंजा येथील हॉटेल रामायण मध्ये अन्न व्यावसायिकांची मार्गदर्शन बैठक घेतली.
बैठकीनंतर शहर व परिसरातील काही हॉटेल व रेस्टॉरंटची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. या तपासणीत नियमभंग करणार्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून एका हॉटेलला आवश्यक सुधारणा होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकार्यांनी बैठकीत उपस्थित हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, भोजनालय तसेच अन्य अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत असलेल्या विविध नियमांची सविस्तर माहिती दिली. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी स्वच्छता, सुरक्षित अन्न साठवणूक, शुद्ध पाणी, कर्मचार्यांची वैयक्तिक स्वच्छता, स्वयंपाकघराची स्वच्छता, अन्न तयार करताना घ्यावयाची काळजी, परवान्यांचे नूतनीकरण, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर टाळणे तसेच अन्न सुरक्षा मानकांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. बैठकीनंतर खेर्डा बुद्रुक येथील मनसपसंत रेस्टॉरंट अँड वाईन बार तसेच हॉटेल जयस्वाल येथे अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने तपासणी केली. तपासणीदरम्यान स्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांबाबत काही त्रुटी आढळून आल्याने संबंधित आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली. याशिवाय एका हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या शेड्यूल-४ मधील महत्त्वाच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. स्वच्छतेचा अभाव, आवश्यक सुरक्षा उपाययोजनांमध्ये त्रुटी तसेच नियमांचे पालन न केल्यामुळे संबंधित हॉटेलला आवश्यक सुधारणा पूर्ण होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सुधारणा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तपासणी करून समाधानकारक स्थिती आढळल्यासच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले.
बैठकीत अधिकार्यांनी स्पष्ट केले की, कारंजा शहरातील प्रामाणिकपणे व अन्न सुरक्षा नियमांचे पालन करून व्यवसाय करणार्या हॉटेल व रेस्टॉरंट चालकांनी कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही. ही कारवाई कोणालाही त्रास देण्यासाठी नसून ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावे आणि शहरातील खाद्य व्यवसायाची गुणवत्ता उंचावावी, हा त्यामागील उद्देश आहे. नियमांचे पालन करणार्या व्यावसायिकांना सहकार्य केले जाईल. मात्र, नियमांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट संदेश या अभियानातून देण्यात आला. बैठकीला कारंजा तालुयातील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.