अनिल कांबळे
नागपूर,
hsrp no plate एचएसआरपी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर आरटीओ विभाग आणि वाहतूक विभागाने कारवाई सुरु केली आहे. पहिल्या दिवशी शहर आरटीओ कार्यालयाने विविध ठिकाणी ४४ वाहनांवर कारवाई करीत एक लाख रुपयांचा दंड वसूल केला. अचानक झालेल्या कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेकांची तारांबळ उडाली आहे.
एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर आजपासून कारवाईचा धडाका सुरु झाला आहे. राज्यातील सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले असून मंगळवारपासून एचएसआरपी नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली असून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. नागपूर शहर आरटीओ अंतर्गत नोंद असलेल्या ४ लाख ३७ हजार ३१३ वाहनांपैकी केवळ २ लाख ३६ हजार २७२ वाहनांवरच एचएसआरपी बसविण्यात आली आहे. तर सारखीच स्थिती ग्रामीणमध्येसुद्धा आहे. त्यामुळे ४ लाख ८६ हजार वाहने अद्यापही एचएसआरपीविना आहेत.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी hsrp no plate झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी परिवहन विभागाने आतापर्यंत सहा वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, परिवहन आयुक्तांनी आता कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करत सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. वाहनांवर एचएसआरपी नसल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. आता १ जुलैपासून रस्त्यावरील एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागपूर शहर आरटीओ (एमएच-३१) अंतर्गत नोंद असलेल्या ४ लाख ३७ हजार ३१३ वाहनांपैकी केवळ २ लाख ३६ हजार २७२ म्हणजेच ५४.२ टक्के वाहनांवरच एचएसआरपी बसविण्यात आली आहे. त्यामुळे २ लाख १ हजार ४१ वाहने अद्यापही एचएसआरपीविना आहेत. तर, पूर्व नागपूर एआरटीओ २ (एमएच-४९) अंतर्गत नोंद असलेल्या ४ लाख ३५ हजार १६० वाहनांपैकी २ लाख ५९ हजार ५८३ म्हणजेच ५७.५८ टक्के वाहनांनी एचएसआरपी बसविली आली आहे. १ लाख ७५ हजार २१४ वाहने अद्यापही जुन्याच नंबरप्लेटसह धावत आहेत. दोन्ही परिवहन कार्यालयांतील आकडेवारीनुसार, शहरातील ४ लाख ८६ हजार ८५५ वाहनांवर अद्यापही नवीन नंबर प्लेट बसविण्यात आली नाही.
एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आदेशाचे पालन करण्यात येत आहे. एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
संतोष काटकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर
एचएसआरपी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिस आणि आरटीओ विभाग संयुक्त कारवाई करणार आहेत. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना कारवाईबाबत सूचना दिल्या आहेत.
- आदित्य मिरखेलकर (पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, नागपूर पोलिस)