भारतीय लष्कराची माहिती आयएसआयला देणारा एजंट अटकेत

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
जैसलमेर,
ISI's Indian agent arrested भारतात हेरगिरीसाठी आर्थिक जाळे उभारणाऱ्या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित मोठ्या नेटवर्कचा राजस्थान पोलिसांच्या सीआयडी इंटेलिजन्सने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात निधी पुरवठा करणाऱ्या एका संशयित एजंटला अटक करण्यात आली असून, देशविरोधी कारवायांसाठी आर्थिक मदत पुरवल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. सीआयडी इंटेलिजन्सच्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये समोर आलेल्या एका हेरगिरी प्रकरणाच्या तपासातून या मोठ्या नेटवर्कचा उलगडा झाला. याआधी जैसलमेरचा रहिवासी झबरा राम आणि आसाममधील दिब्रुगड एअर फोर्स स्टेशनवर कार्यरत एमटीएस कर्मचारी सुमित कुमार यांना अटक करण्यात आली होती. या दोघांवर भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती आयएसआयच्या हँडलर्सपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे.
 
 
८ इ -
 
तपास जसजसा पुढे सरकला, तसतसे या हेरगिरी प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत सीआयडी ला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. या तपासात महाराष्ट्रातील औरंगाबादचा रहिवासी ४१ वर्षीय रफीक चंद शेख हा या नेटवर्कमधील प्रमुख निधी पुरवठादार असल्याचे समोर आले. हेरगिरीच्या बदल्यात मिळणारा पैसा संबंधित आरोपींपर्यंत पोहोचवण्याचे काम रफीक करत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. चौकशीत धक्कादायक बाब समोर आली असून, रफीक शेख गेल्या चार वर्षांपासून एका आयएसआय हँडलरच्या थेट संपर्कात होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची ओळख झाली होती. त्यानंतर हँडलरच्या सूचनेनुसार त्याने स्वतःच्या तसेच इतरांच्या नावाने अनेक बँक खाती उघडली.
 
 
याच खात्यांच्या माध्यमातून संशयितांना पैसे हस्तांतरित करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुरावे हाती आल्यानंतर सीआयडी इंटेलिजन्सने ३० जून २०२६ रोजी रफीक चंद शेखला अटक केली. सध्या त्याची सखोल चौकशी सुरू असून या नेटवर्कमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचा तपास वेगाने सुरू आहे. राजस्थान पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून यामागे मोठे आर्थिक आणि हेरगिरीचे जाळे कार्यरत असण्याची शक्यता आहे. या नेटवर्कमार्फत आणखी कोणाला निधी पुरवला गेला, याचाही तपास सुरू असून राष्ट्रीय सुरक्षेविरोधातील कोणतीही कारवाई सहन केली जाणार नसल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.