“‘काला हिरण : बॅटल फॉर लेगसी’वरून न्यायालयीन लढाई तापली

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
मुंबई
salman khan ‘काला हिरण : बॅटल फॉर लेगसी’ (Blackbuck: Battle for Legacy) या चित्रपटावरून सुरू असलेला वाद अधिकच तीव्र झाला असून, या प्रकरणाची 1 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर ही सुनावणी 6 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. अभिनेता सलमान खानने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली असून, या प्रकरणावरून कायदेशीर तसेच सार्वजनिक स्तरावर मोठी चर्चा सुरू आहे.
 

kala hiran battle for legacy controversy salman khan legal battle intensifies 
सलमान खानने आपल्या याचिकेत या चित्रपटाचे निर्माते आणि संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट 1998 मधील वादग्रस्त ‘काळवीट’ (ब्लकबक) शिकार प्रकरणावर आधारित असल्याचा त्याचा दावा आहे. जरी चित्रपटात त्याचे नाव थेट उल्लेखलेले नसले, तरी पोस्टर, प्रचार साहित्य आणि निर्मात्यांनी दिलेले संकेत हे सर्व त्याच्याशी साधर्म्य दर्शवत असल्याचे सलमानचे म्हणणे आहे. विशेषतः चित्रपटातील पात्राचे सादरीकरण आणि हातात बंदूक असलेला लूक हा त्याच्या प्रतिमेशी मिळता-जुळता असल्याचा मुद्दाही याचिकेत मांडण्यात आला आहे.
दरम्यान, सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे का, अशी विचारणा केली असता, प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही, असे निर्मात्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर निर्माते अमित जानी यांनी सोशल मीडियावरून सलमान खानवर तीव्र टीका केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाकडून सलमान खानला कोणताही दिलासा मिळालेला नाही आणि चित्रपटावर बंदीही घालण्यात आलेली नाही, असे त्यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर नमूद केले. तसेच हे प्रकरण 6 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले असल्याचे सांगत, सलमान खानने स्वतःला बॉलीवूडचा ‘बाप’ समजण्याचे थांबवावे, असा थेट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाचे प्रदर्शन कुठल्याही परिस्थितीत थांबवले जाणार नाही आणि तो जगभरातील 8000 चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित केला जाईल.या संपूर्ण प्रकरणावरून ‘काला हिरण : बॅटल फॉर लेगसी’ हा चित्रपट चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, न्यायालयीन लढाई आणि सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोपांमुळे वाद अधिकच पेटताना दिसत आहे.