कुरखेडा,
kurkheda maize यावर्षी कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मक्याची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, गोदामाच्या अभावामुळे मका खरेदी प्रक्रिया बंद पडल्याने अनेक शेतकर्यांच्या मालाची खरेदी रखडली आहे. या पृष्ठभूमीवर उर्वरित शेतकर्यांच्या मक्याची खरेदी सुरळीत व्हावी व त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्यासोबत शासकीय मका खरेदी मुदतवाढ करण्यात यावी, तसेच खाजगी गोदामात मका खरेदीची परवानगी देऊन लागणारे भाडे त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, गोदाममध्ये खरेदी केलेल्या मका व आविका संस्थामध्ये खरेदी केलेल्या धानाची त्वरित उचल करावी, या मागणीसह विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डां. नामदेव उसेंडी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडाचे उपाध्यक्ष तथा भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये उपस्थित होते. शेतकर्यांच्या समस्यांचे निराकरण करून मका खरेदी तातडीने सुरू करण्याबाबत जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा करण्यात आला.
यावेळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संस्थेचे उपाध्यक्ष चांगदेव फाये यांनी कुरखेडा मका केंद्रापासून वंचित शेतकरी व शेतकर्यांना भेडसावणार्या विविध अडचणींबाबत माहिती दिली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.यावेळी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव तुलावी, शेतकरी नेते घीसु पाटील खुणे, व्यवस्थापक लीलाधर घोसेकर उपस्थित होते. शेतकर्यांच्या हितासाठी मका खरेदी केंद्रातील अडचणी दूर करून खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.