धक्कादायक…25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडला व्यक्ती

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
मुंबई
mumbai rains मुंबईत मुसळधार पावसाचा कहर सुरू असतानाच शहरात दुर्घटनांची मालिकाही सुरू झाली आहे. तीन दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर आता साकीनाका परिसरातील कुर्ला खैराणी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे २० ते २५ फूट खोल असलेल्या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि शोधकार्य सुरू करण्यात आले.
 

kurla man dies after falling into open manhole amid heavy mumbai rains 
या घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या पावसाळी तयारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही आठवड्यांपूर्वीच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शहरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान त्यांच्या समोरच एक पालिका कर्मचारी खड्ड्यात पडल्याची घटना घडली होती. मात्र त्या पाहणीनंतरही पावसादरम्यान अशा दुर्घटना घडत असल्याने महापालिकेच्या उपाययोजनांवर टीका होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, साकीनाका येथील खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ मोबाइलवर बोलत चालत असताना एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडली. संबंधित ठिकाणी खासगी कंत्राटदारामार्फत देखभालीचे काम सुरू असल्याने मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. शोधमोहीमेदरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल घटनास्थळी आढळून आली. मुसळधार पावसामुळे मॅनहोलमधील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने ती व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मुंबई अग्निशमन दल (MFB), पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी संयुक्तपणे शोधकार्य करत आहे