दिल्लीत मोठा दहशतवादी कट उधळला; 4 अटकेत

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Major terror plot foiled in Delhi. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई करत आयएसआय समर्थित आंतरराज्यीय दहशतवादी आणि शस्त्र तस्करी नेटवर्कचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत चार संशयितांना अटक करण्यात आली असून त्यापैकी तीन आरोपी पंजाबमधील तर एक आरोपी दिल्लीतील असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याचा संशय असून पाकिस्तानस्थित आयएसआय हँडलर शहजाद भट्टी याच्या सूचनेनुसार ही संपूर्ण योजना आखली जात होती.
 

संद ४ ७  
 
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून दोन परदेशी बनावटीची पिस्तुले जप्त केली आहेत. यात एक झिगाना आणि एक .30 बोर पिस्तूलचा समावेश आहे. याशिवाय नऊ जिवंत काडतुसे आणि पाच मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून बचाव करण्यासाठी परदेशी मोबाईल क्रमांकांचा वापर करून पाकिस्तानी हँडलर्सशी संपर्कात असल्याचे समोर आले आहे.प्राथमिक तपासात पाकिस्तानमधून ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभदीप सिंग याला यापूर्वी पंजाब पोलिसांनी एनडीपीएस प्रकरणात अटक केली होती. गुरजंत सिंग आणि साजन सिंग हे देखील ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानमधून शस्त्रे आणि अमली पदार्थ मागवण्याच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. साजन सिंगलाही याआधी एनडीपीएस प्रकरणात अटक झाली होती.
 
या प्रकरणातील चौथा आरोपी गगनप्रीत याला दिल्लीत अटक करण्यात आली. दिल्लीतील धार्मिक स्थळे आणि पोलीस ठाण्यांची रेकी करण्याची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली होती. तसेच दिल्लीतील पोलीस आस्थापनांवर गोळीबार घडवून आणण्याचा कटही त्याच्याकडे सोपवण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.स्पेशल सेलने अनेक राज्यांमध्ये तांत्रिक पाळत ठेवत आणि विविध ठिकाणी धाडी टाकत या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश केला. या प्रकरणी बीएनएस आणि शस्त्र कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.