गडचिरोली,
markandadev development मार्कंडादेव परिसरातील विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासह नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचा निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सोमवारी मार्कंडादेव येथे संबंधित यंत्रणांना दिला. नागरिकांशी संवाद साधत त्यांनी भूसंपादन, मंदिर संवर्धन, रस्ते, पूरनियोजन, आरोग्य सुविधा आणि स्थानिक युवकांच्या रोजगारासह विविध विकासकामांचा चर्चेतून आढावा घेतला.
नागरिक संवाद कार्यक्रमात ग्रामस्थांनी विविध समस्या व विकासकामांतील अडचणी मांडल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार, गट विकास अधिकारी, सरपंच तसेच सार्वजनिक बांधकाम, पुरातत्त्व, एमएसआरडीसी, आरोग्य व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांकडून माहिती घेत आवश्यक निर्देश दिले.
मार्कंडादेव वळण मार्गासाठी उर्वरित जमिनीचे भूसंपादन नियमानुसार तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचा निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला. मंदिराच्या संवर्धनाची कामे संथ गतीने सुरू असल्याबद्दल जिल्हाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली. मनुष्यबळ वाढवून सर्व कामे लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी पुरातत्त्व विभागाला दिली.
अतिवृष्टी अथवा धरणातून पाणी सोडल्यामुळे मार्कंडादेवकडे जाणारे मार्ग बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित विभागांनी पर्यायी व्यवस्था, पूरनियोजन आणि आपत्कालीन उपाययोजनांचा सविस्तर आराखडा तयार करून सादर करण्याचा निर्देश दिला. मार्कंडादेव व परिसरातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून स्वतंत्र रोजगार आराखडा तयार करण्याचा निर्देश उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गट विकास अधिकार्यांना देण्यात आला. स्थानिक गरजांनुसार रोजगार निर्मितीच्या संधी विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नावर संबंधित विभागांना निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करण्याचा निर्देश देत विकासकामांची नियमित समीक्षा केली जाईल, असे जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले.