जम्मू,
Mehbooba Mufti to visit Iran इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती इराणला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इराणकडून पाठवण्यात आलेले अधिकृत निमंत्रण त्यांनी स्वीकारले असून त्यांच्या दौऱ्याची पुष्टी झाली आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या शासकीय अंत्यविधीचे कार्यक्रम 4 जुलै ते 9 जुलै 2026 दरम्यान तेहरान, कोम आणि मशहद येथे आयोजित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर इराणने भारतातील अनेक राजकीय आणि धार्मिक नेत्यांना औपचारिक निमंत्रणे पाठवली आहेत.
या संदर्भात बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी आपण इराणला जाणार असल्याची पुष्टी दिली. इराण दौऱ्याबाबत विचारले असता त्यांनी “हो, इन्शा अल्लाह” असे सांगितले. शासकीय शोककाळात त्या इराणी नेतृत्व आणि जनतेप्रती शोकसंवेदना व्यक्त करणार असून खामेनेई यांना अंतिम श्रद्धांजली वाहणार आहेत. इराणकडून पाठवण्यात आलेल्या निमंत्रणांमध्ये काश्मीरमधील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचाही समावेश आहे. यात आगा सय्यद रुहुल्लाह मेहदी, इम्रान अन्सारी, मोहम्मद हनीफा, मसरूर अब्बास अन्सारी आणि आगा सय्यद हसन मोसावी अल सफवी यांचा समावेश आहे. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण दिले होते. मात्र इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या पूर्वनियोजित दौऱ्यांमुळे ते उपस्थित राहू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या ऐवजी भारत सरकारकडून उच्चस्तरीय शिष्टमंडळ इराणमध्ये सहभागी होणार आहे.या शिष्टमंडळात सय्यद अता हसनैन आणि पबित्रा मार्गेरिटा यांचा समावेश असेल.