अनिल कांबळे
नागपूर,
illegal hookah parlour गेल्या काही महिन्यांपासून शहरातील नामांकित हॉटेल्समध्ये हुक्का पार्लर बिनधास्तपणे सुरु होते. मात्र, नवीन पोलिस आयुक्त रुजू होताच सर्वात पहिला वार त्यांनी हुक्का पार्लरवर केला आहे. हॉटेल हेरिटेजमध्ये पोलिसांनी छापा घालून तब्बल ४५ तरुण-तरुणींना हुक्का पितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी हॉटेलचे मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील बजाजनगर, सीताबर्डी, एमआयडीसी, अंबाझरी आणि सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरु आहेत. या हुक्का पार्लरमधून काही पोलिस कर्मचारी वसुली करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे वरिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हुक्का पार्लरवर कारवाईस टाळाटाळ केल्या जाते. मात्र, नवीन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्विकारताच हुक्का पार्लरचे कंबरडे मोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. एनडीपीएस पथकाने सिव्हिल लाइन्स परिसरातील हॉटेल हेरिटेज येथे गुरुवारी मध्यरात्री छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत हुक्का सेवन करताना आढळलेल्या ४५ तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, ३ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागपूरचे नवे पोलिस illegal hookah parlour आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे डीसीपी दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस पथकाने ही धाडसी कारवाई केली. पोलिसांनी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून विविध प्रकारचे हुक्के, फ्लेवर, कोळसा आणि इतर साहित्य जप्त केले. कारवाईदरम्यान काही प्रभावशाली व्यक्तींनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा असली, तरी पोलिसांनी कोणताही दबाव न स्वीकारता कारवाई केली. या प्रकरणात हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापक यांनाही आरोपी करण्यात आले आहे. यापूर्वीही हॉटेल हेरिटेजमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याबाबत तक्रारी मिळाल्या होत्या. मात्र, काही पोलिस कर्मचाऱ्यांमुळे येथे कारवाई होत नव्हती. यावेळी नियोजनबद्ध कारवाई करून पोलिसांनी संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. पोलिस आयुक्त नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, शहरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हुक्का पार्लर, अमली पदार्थ आणि इतर अवैध धंद्यांविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असून, कोणालाही कायद्यापेक्षा वरचे स्थान दिले जाणार नाही. पोलिसांच्या कारवाईपूर्वीच छाप्याची माहिती हॉटेलमालकापर्यंत पुरविणारे आता रडारवर आल्याची चर्चा आहे.