अमरावती,
interstate-thief-stealing-a-bus : इमामवाडा बस स्थानक नागपूर येथून बस चोरी करण्यार्या आंतरराज्यीय चोरट्यास राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे. राजापेठचे बीट मार्शल सांरग आदमणे, विजय धुर्वे यांना माहिती मिळाली की, इमामवाडा बस स्थानक नागपूर येथून एमएच ४९ बीझेड ८२५८ क्रमांकाची शिवाई बस ही रात्रीदरम्यान चोरी गेली. सदर बस ही नंदा मार्केट राजापेठ येथे उभी असून, सदर बस चोरणारा हा गद्रे चौक येथे उभा आहे.
उपरोक्त दोघांनी लगेच धाव घेऊन बस चोरट्यास बससह पोलिस ठाण्यात आणले. त्याला विचारपूस केली असता, त्याने त्याचे नाव विणू गणपती नीलावर (वय २३ वर्ष रा. हईत नगर, जि. रंगारेडी, तेलंगाणा) असे सांगितले. सखोल चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, १ जुलै रोजी रात्री १ वाजता दरम्याान तो इमामवाडा बस स्थानक येथून चार्जिगला असलेली बस चोरी केली. त्याने आतापर्यंत तेलंगाणा, हैद्राबाद, आंध्रपदेश, येथून २० बस चोरल्या आहे. त्याने नांदेड बस डेपो मधून एक बस चोरली आहे. त्याबाबत पोलिस स्टेशन वजीराबाद येथे गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर अन्य ठिकाणीपण गुन्हे दाखल आहे. त्याने सांगितले की, चोरी केलेल्यावर बस मधील बॅटरी, टायर आणि डीस्क काढून घेतो व विकतो. उर्वरीत पार्ट जागेवरच ठेऊन देतो. राजापेठ पोलिसांनी जप्त केलेल्या बसची किमत १ कोटी ५३ लाख आहे. आरोपीला गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, उमेश मुंडे यांचे नेतृत्वात सपोनि नितीन शिंदे, पोलिस अंमलदार मनीष करपे, पवन तिवारी, पंकज खटे, रवि लिखीतकर, शशीकांत शेळके अकुंश काळे, प्रशांत बेलोकर, आकाश यादव, अमोल खंडेझोड, अर्जुन कदम, अमोल देशमुख, रफीक खान, यश ओगले, मंगेश कपीले, नरेश बावणे तसेच सांरग आदमने व विजय धुर्वे यांनी केली.