वर्धा,
pankaj-bhoyar : कृषी विभागाच्या वतीने सन २०२३ व २०२४ या वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त शेतकर्यांचा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मंत्रालयातील दालनात सत्कार केला. जिल्ह्यातील शेतकर्यांना राज्यस्तरीय पुरस्कार अभिमानास्पद आहे, असे सांगून त्यांनी पुरस्कार प्राप्त शेतकर्यांचे अभिनंदन केले व त्यांच्याशी संवाद साधला.
नावीन्यपूर्ण शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, संशोधनाची जोड आणि अथक परिश्रमाच्या बळावर पुरस्कारप्राप्त शेतकर्यांनी राज्यस्तरावर जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. त्यांच्या अनुभवातून आणि कार्यातून राज्यातील इतर शेतकर्यांनाही नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. भोयर यावेळी व्यक्त केला. यावेळी आ. राजेश बकाने देखील उपस्थित होते.
सन २०२३ चा युवा शेतकरी पुरस्कार पवनी येथील युवा प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा प्रमोद महाजन यांना नावीण्यपूर्ण प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबाबत तसेच उप कृषी अधिकारी मनोज गायधने यांनी शेतकर्यांपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचविल्याबद्दल शासकीय श्रेणीतील पद्मशी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार देण्यात आला.
आमगाव मदनी येथील शेतकरी नंदकिशोर गावंडे यांना कृषिभुषण पुरस्कार, पवनार येथील युवा शेतकरी प्रांजल विठ्ठल वाघमारे यांना युवा शेतकरी पुरस्कार व आमगाव मदनी येथील शेतकरी अभय ढोकणे यांना त्यांच्या शेतीतील निष्ठा आणि प्रयोगांसाठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देण्यात आला.