तभा वृत्तसेवा
उमरखेड,
parvez alias lalakhan शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश गुलाबसिंग चव्हाण यांच्यावर 16 जून रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला अखेर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने जेरबंद केले. परवेज ऊर्फ लालाखान सलीमखान (वय 34, रोहिलीपुरा, उमरखेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला शेंबाळपिंपरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
रविवार, 16 जून रोजी रात्री रमेश चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. तपासादरम्यान या गुन्ह्यात एकूण पाच आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी परवेज ऊर्फ लालाखान हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.बुधवार, 1 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तो शेंबाळपिंपरी परिसरात असून तेथून पसार होण्याच्या तयारीत असल्याचे कळले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचला. शेंबाळपिंपरी कळमनुरी मार्गावर संशयित दिसताच पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई स्थागुशा पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक धीरज बांडे, उपनिरीक्षक अमोल राठोड, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनील पंडागळे, रवींद्र शिरामे, राजेश जाधव व सहकाèयांनी पार पाडली.
मुख्य आरोपीच्या अटकेमुळे या गाजलेल्या हल्ला प्रकरणाच्या तपासाला निर्णायक गती मिळणार आहे. या हल्ल्यामागील सूत्रधार, कट रचणारे तसेच हल्ल्यास प्रवृत्त करणाèया व्यक्तींचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील इतर धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.