वर्धा,
police-constable-suspended : विविध कारणांमुळे बहूचर्चीत असणारे रामनगर पोलिस स्टेशन आता पुन्हा नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. या ठाण्यातील कार्यरत पोलिस शिपाई प्रकाश खारडे यांना एका वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. सदर कर्मचाऱ्याचा निलंबन आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी उशिरा रात्री निर्गमित केल्याची माहिती आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर परिसरातील एका दारूविक्रेत्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती लागली होती. या ऑडिओची दखल घेत पोलिस शिपाई प्रकाश खारडे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समजते. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात आले.