बीड,
Raid on Jagdamba Kala Kendra in Beed बीड जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या एका कलाकेंद्रावर धडक छापा टाकला आहे. बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील ‘जगदंबा कला केंद्रा’वर नेकनूर पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (एएचटीयू) बीड यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान 8 महिला आणि 2 पुरुष अशा एकूण 10 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासात संबंधित कलाकेंद्र कोणत्याही प्रकारच्या वैध परवानगीशिवाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. प्रशासकीय परवानगी न घेता हे केंद्र छुप्या पद्धतीने चालवले जात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तसेच आरिफ आसिफ शेख आणि शफिक अली मोमीन हे दोघे या कलाकेंद्राच्या संचालनात सक्रिय असल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

कारवाईनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व संशयितांना ताब्यात घेतले असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी आरिफ शेख, शफिक मोमीन आणि इतर संबंधितांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलाकेंद्राच्या आडून आणखी कोणते बेकायदेशीर प्रकार सुरू होते का, याचाही सखोल तपास सुरू आहे.दरम्यान, बीड जिल्ह्यातील महसूल विभागातही मोठी खळबळ उडवणारी कारवाई समोर आली आहे. माजलगाव शहरालगतच्या वादग्रस्त भूखंडावरील फेरफार स्वतःच्या पत्नी आणि नातेवाईकांच्या नावे मंजूर केल्याप्रकरणी तलाठी संघटनेच्या अध्यक्षावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ही कठोर कारवाई केली.
रूपचंद आभारे असे निलंबित करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात माजलगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांचा समावेश होता. त्यांच्याविरोधात मनमानी कारभाराच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. माजलगाव शहरालगतच्या गट क्रमांक 105 मधील न्यायप्रविष्ट जमिनीवर खरेदीखताच्या आधारे एकाच दिवशी तब्बल 12 फेरफार मंजूर केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.या फेरफारांपैकी काही स्वतःच्या पत्नीच्या, तर काही नातेवाईकांच्या नावे मंजूर करण्यात आल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाली होती. चौकशीनंतर आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी रूपचंद आभारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या निर्णयामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा प्रकरणांवर कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.