नागपूरसह विदर्भात पावसाची दमदार एंट्री; पुढील 4 दिवस अलर्ट

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Rain arrives in Vidarbha नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली असून राज्यभर पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर शहरात रात्री दमदार पाऊस झाल्यानंतर पहाटेपासून पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
 
 

Rain arrives in Vidarbha 
विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाची स्थिती समाधानकारक दिसून आली. भंडारा जिल्ह्यात दिवसभर हलका पाऊस झाल्यानंतर सायंकाळी भंडारा, मोहाडी, लाखनी, पवनी आणि तुमसर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मागील काही दिवसांपासून भात लागवड आणि पेरणी पावसाअभावी रखडली होती. मात्र आता झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना वेग येण्याची चिन्हे आहेत. वर्धा आणि चंद्रपूरमध्येही पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. विदर्भानंतर आता राज्यातील इतर भागांतही पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
 
 
मुंबईमध्ये पुढील चार दिवस मुसळधार
मुंबईमध्ये पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत 24 तासांत तब्बल 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते. पुढील 72 तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून शहरासह उपनगरांमध्ये प्रशासन सतर्क करण्यात आले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे पाणीसंकट कमी होण्यास मदत होणार आहे.ठाण्यात ऑरेंज अलर्टनुसार सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही सखल भागात पाणी साचले असले तरी त्याचा निचरा जलद गतीने झाल्यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला नाही. मात्र पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ झाली असून घोडबंदर रोड, कल्याण आणि नाशिककडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे.
 
 
नद्या-नाल्यांना पूर
पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. धामणे आणि कवडास धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. जव्हार आणि मोखाडा भागात जाणवणारे पाणीटंचाईचे संकटही आता कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय भात पेरणीच्या कामालाही वेग मिळणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.रायगड जिल्ह्यासाठी 2 ते 4 जुलैदरम्यान अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे जिल्ह्यात नद्या-नाल्यांना पूर येणे, सखल भागात पाणी साचणे आणि घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
 
 
 
सर्व बंदरांवर धोक्याचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 जुलैला यलो अलर्ट तर 3 ते 5 जुलैदरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम राहणार असून वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहू शकतो आणि तो 60 किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व बंदरांवर धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.एकूणच नागपूरसह विदर्भात पावसाने दिलासा दिला असला तरी कोकण आणि मुंबईसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यभर हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा कायम असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.