समर-स्वानंदीच्या नात्याला प्रेमाची किनार

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Samar-Swanandi's relationship लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असून मालिकेतील समर आणि स्वानंदीच्या नात्यात आता महत्त्वाचे वळण आले आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारत असलेली स्वानंदी आणि अभिनेता सुबोध भावे साकारत असलेला समर यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. आता या मालिकेत अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली मिळाल्याने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. मालिकेत समरने आधीच स्वानंदीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र स्वानंदीने अद्याप त्याला स्पष्ट उत्तर दिले नव्हते. समरने आपल्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी अनेक खास प्रयत्न केले. स्वानंदीला झाडांची आवड असल्याने त्याने तिच्यासाठी मोकळी जमीन खरेदी केली. इतकेच नव्हे तर मुंबईच्या वरळी सी-लिंकवर ‘I Love You स्वानंदी’ असा संदेश झळकवत आपल्या भावना व्यक्त केल्या. तिच्या नावाचे बॅनर लावत त्याने प्रेम व्यक्त करण्याचा अनोखा अंदाज दाखवला.

swanandi and samar 
समरचे हे प्रयत्न पाहून स्वानंदी भारावली खरी, पण तिने उत्तर देण्यासाठी वेळ मागितला होता.दरम्यान, मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वटपौर्णिमेच्या विशेष ट्रॅकमध्ये समर आणि स्वानंदीच्या नात्यातील भावनिक क्षण पाहायला मिळणार आहेत. स्वानंदीने प्रेम व्यक्त न केल्यामुळे समर नाराज झालेला दिसतो. तो स्वानंदीला स्पष्ट सांगतो की, जर त्यांच्या नात्यात प्रेम नसेल तर तिने वटपौर्णिमेची पूजा करू नये. त्यावर स्वानंदीही थोडी गंमत करत पूजा करणार नसल्याचे सांगते. मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी स्वानंदी पूजा स्थळी पोहोचल्यावर तिला मोठा धक्का बसतो. समर तिच्या आधीच तिथे उपस्थित असतो आणि वडाची पूजा करत असतो. स्वानंदीसाठी समरने दाखवलेली ही भावना पाहून ती भावूक होते. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. समर तिला सांगतो की, तिने त्याच्यासाठी उपवास केला असल्याने तिच्या दीर्घायुष्यासाठी त्यानेही पूजा केली आहे. आपल्या पत्नीचे आयुष्य दीर्घ असावे, अशी त्याची इच्छा असल्याचे तो व्यक्त करतो.