बंगळूरु,
Seven killed in stone quarry accident कर्नाटकातील बंगळूरु दक्षिण जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला. मदापटनाजवळील एका दगडखाणीत मोठा दगड कोसळल्याने सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांमध्ये सर्वजण बिहारमधील कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी कंपनीच्या दगडखाणीत नियमित काम सुरू असताना हा अपघात झाला. सकाळच्या सुमारास कामगार दगडावर काम करत असताना अचानक एक प्रचंड दगड कोसळून थेट कामगारांवर पडला. त्यामुळे अनेक कामगार दगडाखाली अडकले.

प्राथमिक तपासात अपघातावेळी खाणीत सुमारे 15 ते 20 कामगार उपस्थित असल्याचे समोर आले आहे. हिताची कंपनीचे मशीन सुमारे 100 फूट उंचीवर नवीन क्रशरसाठी जागा मोकळी करण्याचे काम करत होते. त्याचवेळी खाली काही कामगार कामात व्यस्त होते. मशीन चालकाचे खाली काम करणाऱ्या मजुरांकडे लक्ष न गेल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू करून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. मात्र दगडाखाली दबून सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अनेक कामगार जखमीही झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या दुर्घटनेनंतर कर्नाटक सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. डी. के. शिवकुमार यांनी म्हटले की, बंगळूर दक्षिण तालुक्यातील मदापटना येथे क्रशरची भिंत कोसळून सात कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक आहे. दिवंगत आत्म्यांना शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली. तसेच खाणकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी खाण मालकांची असल्याचे स्पष्ट करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.