मेक्सिको,
Stampede after Mexico's victory फिफा वर्ल्ड कप 2026 चा थरार सध्या जगभरात रंगला असतानाच मेक्सिकोमध्ये एका ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषाला दुःखद वळण लागले आहे. राउंड ऑफ 32 मधील महत्त्वाच्या सामन्यात मेक्सिकोने इक्वाडोरवर 2-0 असा शानदार विजय मिळवत पुढील फेरीत धडक मारली. या विजयामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जल्लोषादरम्यान मेक्सिको सिटीमध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे आनंदाचे रूपांतर शोकात झाले.मेक्सिकोच्या विजयानंतर राजधानी मेक्सिको सिटीतील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड गर्दी उसळली. पासेओ डे ला रिफॉर्मा आणि आसपासच्या परिसरात तब्बल 10 लाखांहून अधिक फुटबॉल चाहते एकत्र जमल्याचे सांगितले जात आहे. एंजेल ऑफ इंडिपेंडन्स स्मारक परिसर पूर्णपणे चाहत्यांनी फुलून गेला होता. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यांवर उतरलेल्या चाहत्यांची संख्या एवढी मोठी होती की, काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

हॅम्बर्गो आणि लँकेस्टर रस्त्यांवर गर्दीचा ताण प्रचंड वाढल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या गोंधळात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि गुदमरल्यामुळे तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 44 वर्षीय एक पुरुष आणि 19 व 48 वर्षीय दोन महिलांचा समावेश आहे. बुधवारी प्रशासनाने या घटनेची अधिकृत पुष्टी केली.मेक्सिकोसाठी हा विजय अत्यंत ऐतिहासिक ठरला होता. 1986 मध्ये स्वतःच्या यजमानपदाखाली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये मेक्सिकोने बुल्गारियावर मात करत बाद फेरीत विजय मिळवला होता. त्यानंतर तब्बल 40 वर्षांनी मेक्सिकोने पुन्हा नॉकआउट फेरीत विजय मिळवत नवा इतिहास रचला. त्यामुळे संपूर्ण देशभर आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर मेक्सिको सिटी सरकारच्या प्रमुख क्लारा ब्रुगाडा मोलिना यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, पासेओ डे ला रिफॉर्मा परिसरात तीन जण बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व वैद्यकीय प्रक्रिया राबवण्यात आल्या, मात्र दुर्दैवाने तिघांचेही प्राण वाचवता आले नाहीत.या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना कोणताही उत्सव साजरा करताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आणि जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे. मेक्सिकोच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद काही क्षणांतच शोकांतिकेत बदलल्याने संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे.