मुंबई,
Subodh Bhave to play lead in Queen 2 अभिनेत्री कंगना रनौतचा बहुचर्चित ‘क्वीन 2’ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘भारत भाग्य विधाता’नंतर कंगना आता या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर रॅप-अप व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. मात्र, चित्रपटातील प्रमुख अभिनेत्याच्या नावाबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे. एका रिपोर्टनुसार, मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे ‘क्वीन 2’मध्ये कंगना रनौतसोबत प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर सुबोध भावेंच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, कंगना आणि सुबोध भावे पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सेटवर रॅप-अप सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी कंगना रनौत दिग्दर्शक विकास बहल यांना केक भरवताना दिसली. या सेलिब्रेशनमध्ये सुबोध भावेही उपस्थित असल्याने त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली आहे.‘क्वीन 2’चे दिग्दर्शन विकास बहल करत आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत आधीपासूनच मोठी उत्सुकता होती. आता सुबोध भावेंची एंट्री निश्चित झाल्याने ही उत्सुकता आणखी वाढली आहे.मराठी सिनेसृष्टीत सुबोध भावे हे अत्यंत लोकप्रिय आणि दमदार अभिनेता म्हणून ओळखले जातात. अनेक गाजलेल्या चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे. सध्या ते झी मराठीवरील ‘वीण दोघांतली तुटेना’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य : एक युगपुरुष’, ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ आणि ‘हर हर महादेव’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.