नवी दिल्ली,
Three players in trouble due to poor form. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला असला, तरी भारतीय संघातील काही खेळाडूंची कामगिरी सध्या संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषतः संजू सॅमसन, इशान किशन आणि उपकर्णधार तिलक वर्मा यांची सातत्याने होत असलेली निराशाजनक कामगिरी आता त्यांच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 बाद 189 धावांचा मजबूत डाव उभारला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्मा यांनी अर्धशतकी खेळी साकारत संघाला भक्कम आधार दिला. तसेच शिवम दुबे याने 21 चेंडूंमध्ये नाबाद 42 धावांची आक्रमक खेळी करत शेवटच्या षटकांत वेग वाढवला. मात्र काही प्रमुख फलंदाज पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत.
संजू सॅमसन याची फलंदाजी यूके दौऱ्यावर पूर्णपणे अपयशी ठरत आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही तो लवकर माघारी परतला. सातत्याने अपयश आल्याने आता त्याच्या संघातील स्थानाबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. आगामी सामन्यांतही त्याची बॅट शांत राहिली, तर संघ व्यवस्थापन मोठा निर्णय घेऊ शकते. ईशान किशन साठीही यूके दौरा निराशाजनक ठरला आहे. आयर्लंडविरुद्ध त्याने केवळ 1 आणि 12 धावा केल्या, तर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये तो खातेही उघडू शकला नाही. विशेष म्हणजे, त्याच्या शेवटच्या तीन डावांमध्ये तो दोनदा धावबाद झाला आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
भारतीय संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा याने काही धावा केल्या असल्या तरी त्याचा स्ट्राइक रेट संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने शेवटच्या तीन डावांत 19 (21), 55 (46) आणि 13 (13) धावा केल्या आहेत. या स्थानावर वेगाने धावा करण्याची गरज असताना तिलक अपेक्षित प्रभाव पाडू शकलेला नाही. दरम्यान, या मालिकेत इशान किशन आणि तिलक वर्मा यांना आणखी संधी मिळू शकते. मात्र कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर संघ व्यवस्थापन बदल करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत. संजू सॅमसनच्या जागी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. तसेच तिलक वर्माच्या जागी पर्याय म्हणून रिंकू सिंग किंवा हार्दिक पांड्यायांचाही विचार होऊ शकतो. आगामी सामन्यांत या खेळाडूंची कामगिरी भारतीय संघाच्या संयोजनासाठी निर्णायक ठरणार आहे.