मुंबई
uddhav thackeray राजकीय आखाड्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटासमोर पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे राहिले असून पक्षातील गळती सातत्याने वाढताना दिसत आहे. याआधी सहा खासदारांनी पक्ष सोडल्याची घटना घडली होती, त्यानंतर विधान परिषदेतील एका आमदारानेही फुटीचा मार्ग स्वीकारला. 2022 नंतरची परिस्थिती पुन्हा एकदा ठाकरे गटासाठी कठीण बनली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या वाढत्या प्रभावासमोर टिकून राहणे हेच सध्या पक्षातील नेत्यांसमोरील प्रमुख प्रश्न बनला आहे.
या घडामोडींमध्ये केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे, तर स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर पक्ष सोडून जात असल्याचे चित्र आहे. मागील चार वर्षांपासून सुरू असलेली ही गळती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पक्ष सोडणाऱ्यांपैकी बहुतांश जण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या गटातील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सचिन अहिर यांनीही शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर वरळी परिसरात ठाकरे गटाला डॅमेज कंट्रोलसाठी तातडीच्या बैठका घ्याव्या लागल्या.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी जुन्या शिवसैनिकांना पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केले असून त्यासाठी शाखा पातळीवर जुन्या शिवसैनिकांचे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरप्रमुख वसंत मोरे हे ज्येष्ठ शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटातील या घडामोडींनंतर पुण्यातील तब्बल 130 ज्येष्ठ शिवसैनिक मातोश्रीवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या संदर्भात बोलताना वसंत मोरे यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, “एकाबाजूला आपण पाहिलं खुर्चीसाठी, सत्तेसाठी पक्ष सोडणारे आहेत. दुसऱ्याबाजूला बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घ्यायचं म्हणून आसुसलेले चेहरे आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांनी जुन्या शिवसैनिकांचा मेळावा घेतला असता अनेकांनी विनंती केली होती की, “तात्या आता तुम्ही पुणे शहर प्रमुख झालात, निदान तुमच्याकाळात तरी आम्हाला बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन होऊ द्या.” एका शिवसैनिकाने तर भावनिक आवाहन करत म्हटले की, “तात्या मरण्याआधी मला बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घडवा.” ही भावना त्यांनी विनायक राऊत यांच्यामार्फत उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या भेटीस परवानगी दिल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली.वसंत मोरे हे यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कार्यरत होते. ते पुण्यातील मनसेचे चर्चित नगरसेवक म्हणून ओळखले जात होते. पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी मनसे सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांच्या पुढाकाराने पुण्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा हा मोठा गट मातोश्रीकडे जाणार असल्याने ठाकरे गटासाठी ही हालचाल महत्त्वाची मानली जात आहे.