वॉशिंग्टन,
USA-Belgium win in FIFA World Cup फिफा विश्वचषक 2026 मध्ये राऊंड ऑफ 32 मधील सामने अधिकच रोमांचक होत असून यजमान अमेरिका आणि बेल्जियम या दोन्ही संघांनी 16 संघांच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. अमेरिकेने बोस्निया आणि हर्झेगोविनावर 2-0 असा दणदणीत विजय मिळवला, तर बेल्जियमने सेनेगलविरुद्ध शेवटच्या क्षणी जबरदस्त पुनरागमन करत 3-2 असा थरारक विजय नोंदवला. यजमान अमेरिकेसठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा ठरला. 2002 नंतर प्रथमच अमेरिकेने विश्वचषकाच्या बाद फेरीत विजय मिळवला आहे. बोस्निया आणि हर्झेगोविनाविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या हाफच्या 45 व्या मिनिटाला फोलारिन बालोगुनने गोल करत अमेरिकेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र 64 व्या मिनिटाला बालोगुनला रेड कार्ड दाखवण्यात आले आणि अमेरिकेला उर्वरित वेळ 10 खेळाडूंसह खेळावे लागले. एक खेळाडू कमी असतानाही अमेरिकेने दबाव कायम ठेवला. दुसऱ्या हाफच्या 82 व्या मिनिटाला मलिक टिलमनने शानदार गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह अमेरिका आता 7 जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 5:30 वाजता राऊंड ऑफ 16 मध्ये बेल्जियमचा सामना करणार आहे.

दुसरीकडे बेल्जियम आणि सेनेगल यांच्यातील सामना आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वाधिक थरारक सामन्यांपैकी एक ठरला. सामन्याच्या 24 व्या मिनिटाला हबीब दियारा आणि 51 व्या मिनिटाला इस्माईला सार यांनी गोल करत सेनेगलला 2-0 अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. त्यामुळे सेनेगलचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता.मात्र शेवटच्या क्षणी बेल्जियमने अप्रतिम पुनरागमन केले. 85 व्या मिनिटाला रोमेलू लुकाकूने गोल करत स्कोअर 2-1 असा केला. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत युरी टिलेमन्सने गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. अतिरिक्त वेळेत सामना अधिक रंगला आणि 120 व्या मिनिटाला पुन्हा एकदा युरी टिलेमन्सने निर्णायक गोल करत बेल्जियमला 3-2 असा अविस्मरणीय विजय मिळवून दिला. या निकालानंतर फिफा विश्वचषक 2026 च्या राऊंड ऑफ 16 साठी पात्र ठरलेल्या संघांची संख्या 10 वर पोहोचली आहे. मेक्सिको, इंग्लंड, ब्राझील, नॉर्वे, अमेरिका, बेल्जियम, पॅराग्वे, फ्रान्स, कॅनडा आणि मोरोक्को यांनी आतापर्यंत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. उर्वरित सहा जागांसाठी स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.