संधी नाही…तरी वैभवची पोस्ट झाली व्हायरल!

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Vaibhav's post went viral भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. अवघ्या 15 व्या वर्षी आपल्या दमदार फलंदाजीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभवच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे. आयपीएल आणि त्यानंतर श्रीलंकेत झालेल्या तिरंगा मालिकेत त्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे भारतीय संघात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळेल, अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याला प्लेईंग-11 मध्ये स्थान दिले नाही. आता इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे वैभवला पुन्हा एकदा बेंचवर बसावे लागले असून चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 

vaibhav suryavanshi
 
 
 
या पार्श्वभूमीवर वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला. या पोस्टला त्याने फक्त 'कृतज्ञ' असे कॅप्शन दिले. यासोबत त्याने वाळूच्या घड्याळाचा इमोजीही जोडला. एका शब्दातील ही पोस्ट अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. वैभवला संधी न मिळण्यामागे संघातील सलामीच्या स्थानासाठी असलेली तीव्र स्पर्धा हे प्रमुख कारण मानले जात आहे. सध्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी सलामीवीर म्हणून खेळत आहे. डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज अशी ही जोडी संघासाठी संतुलन निर्माण करते. विशेष म्हणजे, 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकण्यात या दोघांचेही योगदान महत्त्वाचे मानले जाते.
 
 
मात्र अलीकडील सामन्यांमध्ये संजू सॅमसनची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. गेल्या तीन सामन्यांत त्याने 5, 0 आणि 1 अशा केवळ 6 धावा केल्या आहेत. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याची बॅट शांत राहिली होती आणि भारताला ती मालिका 2-0 ने गमवावी लागली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही संजूला मोठी खेळी करता आली नाही. त्याने 7 चेंडूत अवघा 1 धाव करत विकेट गमावली. या पार्श्वभूमीवर आगामी दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. आता टीम मॅनेजमेंट युवा खेळाडूवर विश्वास दाखवणार का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.