ग्रामीण विकासासाठी सर्वांनी लोकसहभागातून पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
वाशीम,
village development विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक असून, रोजगारनिर्मिती, शाश्वत उपजीविका आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधणे ही काळाची गरज आहे. विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) अधिनियम-२०२५ अंतर्गत राबविण्यात येणार्‍या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ वेळेत पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
 

village development 
ग्रामपंचायत कळंबा महाली येथील महादेव मंदिर परिसरात २ जुलै रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या शुभहस्ते केंद्र शासनाच्या विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) अधिनियम-२०२५ योजनेचा जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला.यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो संजय नागटिळक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, तहसीलदार निलेश पळसकर, गटविकास अधिकारी रविंद्र सोनवणे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यासाठी रोजगार, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, जलसंधारण, सार्वजनिक मालमत्तेची निर्मिती आणि शाश्वत उपजीविकेची साधने निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायती, संबंधित विभाग आणि नागरिकांनी परस्पर समन्वयाने काम करावे. गावांच्या गरजेनुसार दर्जेदार व टिकाऊ विकासकामे उभारून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागरिकांनी शासनाच्या ग्रामीण विकास योजनांचा लाभ घेण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. योजनांची पारदर्शक व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे आयोजन रोहयो विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी उपस्थितांना योजनेची उद्दिष्टे, अंमलबजावणीची प्रक्रिया तसेच ग्रामीण रोजगार व शाश्वत आजीविका वृद्धीसाठी उपलब्ध विविध संधींची माहिती देण्यात आली. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा उल्लेख करत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक रोहयो उपजिल्हाधिकारी संजय नागटिळक यांनी केले. त्यांनी या अभियानाचा उद्देश स्पष्ट केला.कार्यक्रमादरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) जिल्ह्यात ११७ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ग्रामपंचायत परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.