खामेनेईंच्या रक्ताचा बदला घेणार!

शांतता चर्चेदरम्यान इराणचा आक्रमक इशारा

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
तेहरान,
Will exact revenge for Khamenei मध्यपूर्वेत इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष सध्या थांबलेला असला तरी दोन्ही देशांमधील तणाव अद्यापही कायम आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी अप्रत्यक्ष चर्चा सुरू असतानाच इराणकडून अत्यंत तीव्र आणि आक्रमक भूमिका समोर आली आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल, असा स्पष्ट इशारा इराणने दिल्याने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे.इराणी माध्यमांतील वृत्तांचा हवाला देत समोर आलेल्या माहितीनुसार, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहम्मद बाकेर झोलकाद्र यांच्या स्वाक्षरीचा एक संदेश चर्चेत आला आहे. या संदेशात अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. खामेनी यांच्या रक्ताचा बदला निश्चित घेतला जाईल, असा ठाम संदेश इराणकडून देण्यात आला आहे.
 
 
 
Khamenei
 
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला होता. या हल्ल्यात इराणमधील अनेक वरिष्ठ अधिकारीही ठार झाले होते. खामेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम 4 ते 8 जुलैदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी झालेला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. इराणने अमेरिकेसोबत थेट संवाद साधण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराणचे म्हणणे आहे की, अमेरिकेने सामंजस्य करारातील अटी अद्याप पूर्ण केलेल्या नाहीत. जोपर्यंत अमेरिका आपल्या आश्वासनांची पूर्तता करत नाही, तोपर्यंत कोणत्याही थेट चर्चेला तयार नसल्याची भूमिका इराणने घेतली आहे.
 
 
याशिवाय, इराणने आणखी एक महत्त्वाची अट पुढे ठेवली आहे. इस्रायली सैन्याने लेबनॉनमधून माघार घेतल्याशिवाय कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत, असे इराणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कतारची राजधानी दोहा येथे उपस्थित असलेल्या अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांमध्ये कोणतीही प्रत्यक्ष चर्चा होऊ शकलेली नाही.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर सध्या दोहा येथे उपस्थित आहेत. मात्र इराणी शिष्टमंडळाने त्यांच्याशी संवाद साधण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी इराणसोबत अणुकार्यक्रमासंदर्भातील चर्चा योग्य दिशेने पुढे जात असल्याचा दावा केला आहे.