वर्धा,
aarogya-amrut-mahotsav : सार्वजनिक आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या संयुक्त वतीने आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील पहिल्या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन २२ ते २४ जुलै दरम्यान स्थानिक बच्छराज धर्मशाळा येथे करण्यात आले आहे. उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते २२ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार अमर काळे, आ. डॉ. मनीषा कायंदे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. अरुण लाखानी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, माजी खासदार अजय संचेती, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात वर्धा व सेलू तालुक्यातील नागरिकांना विविध आजारांचे मोफत निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी, स्त्रीरोग, दंतरोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग तसेच संसर्गजन्य रोगांची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय रक्त तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, औषध वितरण, मोफत चष्म्यांचे वाटप, दिव्यांगांना साहित्य वितरण तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र तपासणी कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे.
रक्तदान लहान हॉलमध्ये, नेत्र तपासणी मोठ्या हॉलमध्ये, असंसर्गजन्य रोग तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी लाभार्थी सहाय्य कक्ष खुल्या जागेत करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमंत वाघ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आजारांचे वेळेत निदान करून घ्यावे आणि या दुर्मिळ संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनीही बच्छराज धर्मशाळेला भेट देऊन पाहणी केली.