बीडच्या बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन?

एटीएस तपासात धक्कादायक दुवे

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
बीड
akistani connection to the fake trust in Beed महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात बीड आणि सोलापूर जिल्ह्यांतील दोन कथित बनावट ट्रस्टमधील आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान बार्शी येथील 'अल हलिमी' या ट्रस्टचे माजलगाव येथील 'गुलजार-ए-रजा' या ट्रस्टशी आर्थिक संबंध असल्याचे उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या व्यवहारांचा पाकिस्तानातील वादग्रस्त 'दावत-ए-इस्लामी' संस्थेशी आणि कुख्यात दहशतवादी शहजाद भट्टी गँगशी कथित संबंध असल्याच्या दृष्टीनेही चौकशी सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर एटीएसच्या बीड युनिटने माजलगाव येथील 'गुलजार-ए-रजा' ट्रस्टची चौकशी करत या संस्थेच्या नावावर सुरू असलेल्या पाच वेगवेगळ्या बँक खात्यांमधून तब्बल 4 कोटी 73 लाख रुपयांच्या देणग्यांचे व्यवहार झाल्याचे उघड केले होते. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संबंधित ट्रस्टचे फॉरेन्सिक ऑडिटही सुरू आहे.
 
 
ats
 
यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे 'अल हलिमी' नावाने कार्यरत असलेल्या आणखी एका कथित बनावट ट्रस्टचा तपास सुरू झाला. या ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे 10 कोटी रुपयांच्या देणग्या गोळा करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दोन्ही ट्रस्टमधील आर्थिक व्यवहार आणि निधीचा प्रवाह एटीएसकडून बारकाईने तपासला जात आहे. तपास यंत्रणा या दोन्ही ट्रस्टचे इतर धर्मादाय संस्था किंवा संघटनांशी काही संबंध होते का, याचाही शोध घेत आहेत. तसेच या ट्रस्टच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, त्यांचे सध्याचे व्यवसाय आणि आर्थिक व्यवहारांचीही पडताळणी सुरू आहे. एटीएसकडून या संपूर्ण प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू असून येत्या काळात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.