युवकांनी राष्ट्रनिर्माणासाठी पुढे यावे

2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करूया : आशिष प्रतापवार

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
ashish-pratapwar : देशातील युवकांमध्ये अमर्याद शक्ती असून त्यांनी राष्ट्रभक्ती, निःस्वार्थ सेवाभाव आणि समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतल्यास भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यवतमाळ विभाग सद्भाव प्रमुख आशिष प्रतापवार यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उमरखेड नगर व उमरखेड खंडाच्या वतीने पोलिस ठाणे परिसरातील श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित युवा संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
 
 
 
y20July-Pratapwar
 
 
 
प्रतापवार पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या 100 वर्षांत अनेक प्रतिकूल परिस्थितींवर मात करत अखंड समाजकार्य केले आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘पंच परिवर्तन’ ही संकल्पना मांडण्यात आली असून त्यामध्ये स्वबोध (स्वत्व जागरण), नागरिक कर्तव्य, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन या पाच विषयांचा समावेश आहे. या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास समाजात व्यापक आणि सकारात्मक परिवर्तन घडू शकते.
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात नगर संघचालक अनिरुद्ध मुक्कावार यांनी प्रत्येक व्यक्ती समाजाचा ऋणी असल्याचे सांगत आपल्या क्षमतेनुसार समाजहिताचे विधायक कार्य करण्याचे आवाहन केले. समाजासाठी कार्य करणारेच खरे महापुरुष ठरतात, असे त्यांनी नमूद केले.
 
 
तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट करत संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याचा आढावा घेतला. हिंदू समाज संघटित होऊन स्वत्वाची जाणीव जागृत झाल्याशिवाय भारत परमवैभवशाली राष्ट्र बनू शकत नाही, या विचारातून संघाची स्थापना झाल्याचे आशिष प्रतापवार यांनी सांगितले.
 
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी उमरखेड तालुका कार्यवाह गोपाळ हिंगमिरे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. उदघाटन सत्रानंतर एक तासाची शाखा घेण्यात आली. यामध्ये विविध खेळ व शारीरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर गटशः चर्चासत्र झाले.
या सत्रात आशिष प्रतापवार यांनी युवकांना समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजहिताचे उपक्रम राबविण्याचे, सामाजिक एकात्मता दृढ करण्याचे आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. आभारप्रदर्शन नगर कार्यवाह सुयोग साकळे यांनी केले. युवा संमेलनाला शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.