तभा वृत्तसेवा
उमरखेड,
atm-card-fraud : स्टेट बँकेच्या एटीएममधून स्टेटमेंट काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून एका मजुराच्या खात्यातून 2 लाख 5 हजार काढून घेतले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी 4.30 च्या सुमारास पुसद मार्गावरील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये उघडकीस आली. या प्रकरणी उमरखेड पोलिसात तीन अनोळखी इसामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बरातीलाल बाबूलाल निसाद (वय 56) असे फसवणूक झालेल्या मजुराचे नाव आहे. शुक्रवार, 17 जुलै रोजी दुपारी ते या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी प्रथम एटीएममधून 10 हजार काढले. त्यानंतर खाते स्टेटमेंट काढण्यासाठी पुन्हा एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकत असताना एटीएम केबिनमध्ये उपस्थित असलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांच्याशी संवाद साधला.
त्यातील एका इसमाने, आपको स्टेटमेंट निकालने नही आता, असे सांगत बरातीलाल यांच्या हातातील एटीएम कार्ड घेतले आणि स्वतः मशिनमध्ये टाकून पिन क्रमांक विचारला. त्यांनी विश्वासाने पिन सांगितल्यानंतर त्या इसमाने स्टेटमेंट निघत नसल्याचे सांगून दुसरे एटीएम कार्ड त्यांच्या हातात दिले. बरातीलाल यांनी कार्ड तपासले नाही आणि ते घरी निघून गेले.
दुसèया दिवशी सकाळी बरातीलाल यांनी अॅपद्वारे खात्याची शिल्लक तपासली असता खात्यातून 2 लाख 5 हजार रुपये कमी झाल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या जवळील कार्ड हे त्यांचे नसून दुसèयाचे असल्याचे समोर आले.
त्यानंतर खात्याचे स्टेटमेंट तपासले असता 17 व 18 जुलै रोजी विविध व्यवहारांद्वारे एकूण 2 लाख 5 हजार रुपये काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तीन अनोळखी आरोपींनी विश्वास संपादन करून बरातीलाल यांच्या खात्यातून रक्कम काढून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार देण्यात आली.