मुंबई,
Ban on assembly in Mumbai until August 6 'नीट' (NEET) परीक्षा आणि रोजगाराच्या प्रश्नावर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाने व्यापक सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. राजधानी दिल्लीत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, त्याचे पडसाद इतर शहरांमध्ये उमटू नयेत यासाठी मुंबईत २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कॉकक्रोच जनता पार्टी (CJP)च्या कार्यकर्त्यांनी संसद भवनाकडे मोर्चा काढला. आंदोलक संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. खबरदारीचा उपाय म्हणून संसद भवनाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जलद प्रतिसाद पथकाची (QRT) परिसरात नियुक्ती करण्यात आली. काही काळासाठी इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली होती.
दरम्यान, आंदोलनात महत्त्वाची घडामोड घडली असून, आंदोलनाचे नेते अभिजीत दीपके यांनी अडीच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले आहे. सरकारच्या वतीने ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असून, संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.दिल्लीतील परिस्थितीचा परिणाम मुंबईत होऊ नये आणि शहरातील शांतता अबाधित राहावी, यासाठी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार २३ जुलै ते ६ ऑगस्ट या १५ दिवसांच्या कालावधीत विनापरवानगी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, मोर्चे काढण्यास किंवा सार्वजनिक सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिस गस्त वाढवण्यात आली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. गृहविभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.