आमदाराच्या कारला भीषण अपघात; पंढरपूरला दर्शनाला जाताना घडली दुर्घटना

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
सोलापूर
narayan kuche सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. जामखेड शिवारात हा अपघात झाला असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 

bjp mla narayan kuche car accident in solapur no casualties reported 
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नारायण कुचे आणि त्यांचे सहकारी छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त विठुरायांच्या दर्शनासाठी जात होते. याच प्रवासादरम्यान जामखेड परिसरात त्यांच्या ताफ्यातील एका कारला अपघात झाला. धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उलटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.अपघातग्रस्त कारमध्ये आमदार नारायण कुचे स्वतः उपस्थित नव्हते. कारमध्ये त्यांचा चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी प्रवास करत होते. आमदार त्या वाहनात नसल्याने ते या दुर्घटनेतून बचावले. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, कारमधील तिघेही सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.
आषाढी वारीचा सोहळा सुरू असल्याने राज्यभरातून अनेक नेते आणि भाविक पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार नारायण कुचे हेही पंढरपूरकडे रवाना झाले होते. त्यांच्या ताफ्यात अनेक वाहने होती. प्रवासादरम्यान आमदार कुचे त्यांच्या नियमित कारमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारमधील तिघांना सुरक्षित ठिकाणी हलवले तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या घटनेबाबत आमदार नारायण कुचे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.दरम्यान, समृद्धी महामार्गावरही मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील विरुळ गावाजवळ झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मालवाहू वाहनाने कारला धडक दिल्यानंतर कारने पेट घेतला. या दुर्घटनेत कारमधील चार जणांचा आणि मालवाहू वाहनातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.