माकडी येथे रानकुत्र्यांच्या हल्ल्यात काळवीट ठार

- वन विभागाकडून पंचनामा ः शवविच्छेदनानंतर पुढील कार्यवाही

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
गोंदिया, 
blackbuck-killed : गोंदिया सहवन क्षेत्रांतर्गत येणार्‍या माकडी येथे शनिवारी 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास रानकुत्र्यांच्या हल्ल्यात एका काळवीटाचा (ब्लॅकबक) मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमी आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 
blackbuck-killed
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, माकडी परिसरात विचरण करणार्‍या काळवीटाचा रानकुत्र्यांच्या एका कळपाने पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी काळवीटाने आटोकाट प्रयत्न केला. मात्र, रानकुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोंदिया सहवन क्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक मुकेश भांडारकर यांनी वन कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत काळवीटाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दासगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, काळवीट हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अनुसूची-1 (शेड्यूल-1) मधील अत्यंत संरक्षित वन्यप्राणी आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूची घटना गंभीर मानली जात आहे. अलीकडच्या काळात वन्यजीवांशी संबंधित घटनांमध्ये वाढ होत असल्याने त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वन विभागाने नागरिकांना वन्यजीव दिसल्यास त्यांना कोणतीही हानी न पोहोचविता तातडीने वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
 
 
समन्वयाची गरज ...
 
 
पर्यावरण व वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण, रानकुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणि वन्यजीव सुरक्षेसाठी वन विभाग, स्थानिक प्रशासन व नागरिक यांनी समन्वयाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.