तभा वृत्तसेवा
उमरखेड,
burglary-umarkhed : शहरातील साईश्रद्धानगर परिसरात अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून दागिने व रोख रक्कम असा एकूण 32 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रमेश आकोसकर हे रविवार, 19 जुलै रोजी घराला कुलूप लावून कुटुंबासह मुळावा येथे गेले होते. रात्री त्यांच्या मोठ्या भावाने फोन करून घराचे कुलूप तुटलेले दिसत असल्याची माहिती दिली. त्यानंतर रमेश आकोसकर तातडीने घरी परतले असता घराचे कुलूप व कोंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केल्याचे आढळले.
चोरट्याने घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून त्यामधील 1 ग्रॅम सोन्याच्या 2 अंगठ्या, 1 ग्रॅमची सोन्याची बाळी, लहान मुलाचे चांदीचे दागिने तसेच कपाटात ठेवलेली 16 हजार रुपयांची रोख असा एकूण 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या गुन्ह्याची नोंद सहायक फौजदार दयानंद जांभळे यांनी केली असून पुढील तपास जमादार जयकुमार राठोड करीत आहेत. पोलिसांकडून परिसरातील संशयितांची चौकशी करत चोरांचा शोध सुरू आहे.
एका आठवड्यात अनेक घरफोडी !
शहरातील व शहरालगत असलेल्या ग्रामीणभागात चोरांनी उच्छाद मांडला असून अनेकांची घरे व दुकाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या अनेक घटना या आठवड्यात घडल्या. तसेच दहागाव फाट्यावर एका वृद्धाची दिवसाढवळ्या सोन्याची अंगठी पोलिस असल्याची बतावणी करून लंपास केली असून एका व्यापाèयाची दिवसाढवळ्या दुकानासमोरून चार चाकी वाहनातून दीड लाखाची बॅग लंपास केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शहरात घडत असलेल्या या चोरांच्या कारवायांमुळे जनता भयभीत झाली आहे.